प्रत्येक गुन्ह्यामागे कुठलं ना कुठलं कारण असतं. अशीच एक धक्कादायक क्राईम स्टोरी आंध्र प्रदेशमधून समोर आली आहे. एका आईने घेतलेल्या खुनी बदल्याची ही गोष्ट. मुलाच्या दफनविधीवेळीच आईने तिच्या मुलाच्या खुन्यांचा बदला घेण्याची शपथ घेतली. त्यानंतर तिने तिच्या मुलांच्या खुन्यांचा असा काही बदला घेतला की, ज्याबाबत वाचल्यावर कुणीही कुठल्या आईपासून तिच्या मुलांना हिरावून घेण्याचा विचारही करणार नाही.
ही गोष्ट आहे आंध्र प्रदेशमधील रहिवासी असलेल्या जान बी या महिलेची. जान बी हिच्या पतीचा १५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ती तिच्या दोन मुलांसह आंध्र प्रदेशमधील पंडालू जिल्ह्यात राहाते. तिचा मोठा मुलगा १७ वर्षांचा तर लहान मुलगा १६ वर्षाचा होता. दोन वर्षांपूर्वी तिची ओळख बाजी नावाच्या इसमाशी झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र जान बीच्या मोठ्या मुलाला ही गोष्ट आवडत नव्हती. त्याने आपल्या आईला भेटू नकोस म्हणून बाजीला बजावले. त्यामुळे नाराज झालेल्या बाजीने ऑगस्ट २०२१ मध्ये अल्ला कसम नावाच्या मित्रासोबत मिळून जान बी हिच्या मोठ्या मुलाची हत्या केली.
मुलाच्या हत्येमुळे जान बी. संतप्त झाली. तिने मुलाची हत्या करणाऱ्यांचा बदला घेण्याची शपथ घेतली. मुलाच्या मृत्यूनंतर तीन महिन्यात म्हणजे सुमारे दीड वर्षांपूर्वी तिने मुलाचा खुनी अल्ला कसम याची तिने हत्या केली. त्यानंतर तिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. काही महिने तुरुंगात राहिल्यानंतर ती जामिनावर बाहेर आली.
मुलाच्या हत्येतील एका आरोपीला ठार मारल्यानंतर तिने दुसऱ्या आरोपीचा बदला घेण्यासाठी योजना आखली. सुडाने पेटलेली जान बी आपली हत्या करू शकते याची जाणीव या दुसरा आरोपी असलेल्या बाजी याला होती. तो बरेच दिवस भूमिगत राहिला. अचानक एके दिवशी जान बी हिने त्याला फोन केला. तसेच ती पुन्हा त्याच्या प्रेमात पडल्याचे सांगितले. मी तुझ्यासोबत राहू इच्छिते असेही तिने सांगितले. त्यानंतर काही दिवस तिने बाजीसोबत प्रेमाचं नाटक केलं.
मंगळवारी भावाच्या वाढदिवसादिवशी जान बी हिने बाजी याला घरी बोलावले. त्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये तिने बाजीला खूप दारू पाजली. त्यानंतर भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने तिने बाजीचा खून केला. त्यानंतर बाजीच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच अर्धा जळालेला मृतदेह तिने खड्डा खोदून पुरून टाकला. मुलाच्या दोन्ही खुन्यांना तिने ठार मानले. त्यानंतर तिने पुन्हा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.