रांची : ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी झारखंड भाजपचे अध्यक्ष तला मरांडी यांचा मुलगा मुन्ना मरांडी याच्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. मुन्नाने दोन वर्षे आपले लैंगिक शोषण केल्यानंतर दुसऱ्याच मुलीशी लग्न केले, अशी तक्रार दुसऱ्या एका मुलीने गुरुवारी केल्यानंतर याचा भंडाफोड झाला. लग्नाचे वचन देऊन मुन्नाने आपल्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. मात्र, त्याने शब्द पाळला नाही, असे या मुलीने गोड्डा जिल्ह्यातील न्यायालयात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मुन्नाने आपल्याला संपर्कात राहण्यासाठी मोबाईल घेऊन दिला होता. त्याने अनेकदा आपला उपभोग घेतला आणि दुसऱ्याच मुलीशी लग्न ठरविले, असा आरोप या मुलीने केला. मुन्नाच्या विवाहाची माहिती समजल्यानंतर या मुलीने तक्रार दिली. मुन्नाचा मंगळवारी एका मुलीशी विवाह झाला. ही मुलगी ११ वर्षांची असल्याचे समजते. कायद्यानुसार मुलीचे लग्नाचे वय १८ आहे. पीडित मुलीने झारखंड महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे. आपल्या मुलाचा कथितरीत्या अल्पवयीन मुलीशी विवाह लावून दिल्याबद्दल तला मरांडी यांनाही नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले. मुन्नाच्या विवाहाचा स्वागत समारंभ गोड्डा येथे झाला. राज्याचे मुख्यमंत्री रघुवर दास जिल्ह्यात असूनही स्वागत समारंभाकडे फिरकले नाहीत. (वृत्तसंस्था)>भाजपाच्या झारखंड प्रदेश शाखेने या मुद्द्यावर मौन बाळगले आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.वादात ओढले जाऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वागत समारंभाला उपस्थित राहणे टाळले.
भाजपा नेत्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा
By admin | Published: July 02, 2016 6:13 AM