जामतारा (झारखंड) : झारखंडचे काळजीवाहू मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यावर झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्या जातीबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. १९ डिसेंबर रोजी सोरेन यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद उपाध्याय यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर मिहिजाम पोलीस ठाण्यात दास यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.
प्रचारसभेत रघुबर दास यांनी माझ्या जातीवर ‘आक्षेपार्ह’ वक्तव्ये केली, असा आरोप करणारी तक्रार हेमंत सोरेन यांनी दुमका पोलीस ठाण्यात दिली होती. मी दास यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याचे सोरेन यांनी बुधवारी वार्ताहरांशी बोलताना सांगितले होते. ‘दास यांच्या शब्दांमुळे माझ्या भावना आणि सन्मान दुखावला गेला. आदिवासी कुटुंबात जन्म घेणे हा गुन्हा आहे का’, असे सोरेन म्हणाले होते. सोरेन यांनी दास यांच्यावर केलेला आरोप ‘हास्यास्पद’ आहे, असा दावा झारखंड भाजपचे प्रवक्ते प्रतूल शहादेव यांनी केला.