नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटपाच्या संदर्भात सीबीआयने नागपूरस्थित बैद्यनाथ समूहाच्या कंपन्यांसह महाराष्ट्रातील अन्य दोन कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तथापि या अन्य दोन कंपन्यांची नावे सीबीआयने अद्याप उघड केलेली नाहीत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तथ्य लपविण्याच्या आरोपाखाली भारतीय दंडसंहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अन्य कलमाअंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. च्यवनप्राशसह अन्य हर्बल औषधांचे निर्माण करणाऱ्या बैद्यनाथ समूहाला कॅप्टिव्ह कोळसा खाणपट्ट्याचे वाटप झाले होते. मात्र या समूहाने तो परत केला होता. यानंतर समूहाने पुन्हा नव्या कोळसा खाणपट्ट्यासाठी अर्ज करीत भांदक कोलब्लॉक मिळवला होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे कोळसा मंत्रालयाचा पदभार असताना त्यांना हा कोलब्लॉक मिळाला होता. यापश्चात आंतर-मंत्रालयीन समूहाने खननकार्य सुरू न झाल्याच्या सबबीवर या खाणपट्ट्याचे वाटप रद्द केले होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश शर्मा यांच्यासह बैद्यनाथ समूहाच्या कंपनीच्या प्रमोटर्सना याप्रकरणी समन्स जारी करण्यात आले आहेत. संगनमताने कटाबद्दल कलम १२०(बी) आणि कोळसा मंत्रालयापासून तथ्य लपविण्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कोळसा मंत्रालयाच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
बैद्यनाथसह तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: May 20, 2015 2:40 AM