पणजी : भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या कथित खूनप्रकरणी गोवा पोलिसांनी आणखी एका ड्रग पेडलरला (अमली पदार्थांची विक्री करणारा) अटक केली. त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे.
माजी टिकटॉक स्टार, तसेच बिग बॉस या रिॲलिटी टीव्ही शोच्या स्पर्धक फोगाट यांचा २३ ऑगस्ट रोजी गोव्यात संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. त्यांना त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी बळजबरीने अमली पदार्थ दिल्याचा आरोप आहे. अंजुना पोलिसांनी काल रात्री ड्रग पेडलर रामा ऊर्फ रामदास मांद्रेकर याच्या मुसक्या आवळल्या.
रामाने दुसरा एक ड्रग पेडलर दत्तप्रसाद गावकर याला अमली पदार्थ पुरवले होते. नंतर गावकरने त्याची या प्रकरणातील अन्य दोन आरोपी सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांना कथितरीत्या विक्री केली होती. सांगवान व सिंग यांनी फोगाट यांना हा अमली पदार्थ दिला होता. त्यानंतर फोगाट यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले होते. सांगवान आणि सिंग हे फोगाट यांच्यासोबत गोव्याला आले होते. फोगाट यांना देऊन उरलेला अमली पदार्थ पोलिसांनी नंतर रेस्टाॅरंटच्या वॉशरूममधून जप्त केला होता. सांगवान व सिंग यांनी फोगाट यांना मेथामफेटामाइन हा अमली पदार्थ दिल्याचे तपासात समोर आले आहे.
तिघांना पाच दिवसांची कोठडीसोनाली फोगाटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन जणांना न्यायालयाने रविवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गोव्यातील कर्लिस रेस्टॉरंटचा मालका एडविन न्युन्स याच्यासह ड्रग पेडरल दत्तप्रसाद गावकर व रमाकांत मांद्रेकर यांना पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्यांना पाच दिवस कोठडीत ठेवण्यात आदेश दिले. न्युन्स याने जामिनासाठी अर्ज सादर केला होता. तथापि, न्यायालयाने तो फेटाळला.
हरयाणा सरकारकडून सीबीआय चौकशीचा आग्रहचंडीगड : हरयाणा सरकार सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीसाठी गोवा सरकारला पत्र पाठवणार आहे. सोनाली यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची चंडीगड येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी करणारे निवेदन दिले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार गोवा सरकारला याबाबत पत्र पाठवून आग्रह धरेल, अशी ग्वाही त्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत सोनाली यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. या संकटाच्या काळात सरकार सोनाली यांच्या कुटुंबासोबत आहे, असे ते म्हणाले. सोनाली यांची मुलगी यशोधरा हिच्याशिवाय त्यांची बहीण आणि भाऊ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.