भाजपाच्या मध्य प्रदेशमधील एका आमदाराला गोव्यामध्ये कॉलगर्लने मारहाण केल्याचे वृत्त पसरल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेश काँग्रेसने वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेले हे वृत्त ट्विट करत या मुद्द्यावरून भाजपाची कोंडी करँण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता गोवा पोलिसांनी या प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
काँग्रेसने याबाबतचे वृत्त ट्विट केलेल होते. वृत्तपत्रामधील त्या वृत्तामध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटले होते की, गोव्यातील एका हॉटेलमध्ये भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री त्यांच्या दोन सहकाऱ्यांसोबत गेले होते. तिथे पैशांच्या देवाणघेवाणीवरून कॉलगर्लचं काम करणाऱ्या मुंबईतून आलेल्या बॉलिवूडमधील कलाकार तरुणीसोबत त्यांचा वाद झाला. एस्कॉर्ट सर्व्हिससाठी निश्चित करण्यात आलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम दिली जात असल्याने ती नाराज झाली होती. त्यामुळे ही तरुणी एवढी संतापली की, तिने या आमदारांना चपलांनी मारहाण केली. मारहाणीमुळे आमदारांच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा झाल्या. अखेर हॉटेल व्यवस्थापनाने दोघांमध्ये मध्यस्थी केली. तसेच हे प्रकरण मिटवून टाकले. त्यामुळे पोलिसांत तक्रार दिली गेली नाही.
ही बातमी जेव्हा मध्य प्रदेशामध्ये व्हायरल झाली तेव्हापासून कॉलगर्लने मारहाण केलेला नेता नेमका कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना लागली आहे. तसेच मारहाण झालेला नेता हा माजी मंत्री असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे नेते अधिकारी आणि पत्रकार असे सगळेजण हा मंत्री कोण हे शोधण्यात गुंतले आहेत. तसेच मध्य प्रदेश सरकारही सक्रिय झाले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या यांच्या कार्यालयामध्येही ही बातमी पोहोचली आहे. तसेच याबाबत तपास करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
मध्य प्रदेश पोलिसांना याबाबत अधिकृत पत्र गोवा पोलिसांना पाठवले आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तीच्या नावाची माहिती देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर गोवा पोलिसांनी जवळपास दोन दिवस तपास करत मध्य प्रदेश पोलिसांना रिपोर्ट पाठवला आहे. गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंतच्या तपासात हे प्रकरण बनावट असल्याचे दिसून आले आहे.
याबाबत गोव्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्याकडे या घटनेशी संबंधित कुठलीही माहिती नाही आहे. आतापर्यंत तर हे प्रकरण पूर्णपणे बनावट वाटत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर या प्रकरणात महाकौशर क्षेत्रातील दोन नेत्यांची नावं समोर येत होती. मात्र मध्य प्रदेश पोलिसांनि त्यांच्या लोकेशनची तपासणी केली तेव्हा त्यांचं लोकेशन मध्य प्रदेशमध्येच दिसून आलं.