नवी दिल्ली:दिल्लीपोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्या निवासस्थानी पोहोचले. आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या हॉर्स ट्रेडिंगच्या आरोपाप्रकरणी क्राइम ब्रँचचे एसीपी केजरीवालांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवालांनी आरोप केला होता की, भाजप पक्ष त्यांच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे 21 आमदार फोडण्याची योजना असल्याचे केजरीवाल म्हणाले होते.
दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, भाजप आम आदमी पार्टीच्या आमदारांना 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे. त्यांचे सात आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला असून, योग्य वेळ आल्यावर ऑडिओ क्लिपही रिलीज करू, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, या प्रकरणी दिल्ली पोलीस क्राइम ब्रँच आतिशी यांना नोटीसही पाठवू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
आम आदमी पार्टीच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
मात्र, दिल्ली भाजपने हे आरोप फेटाळून लावले असून दिल्ली भाजपचे सचिव हरीश खुराना यांनी आतिशी यांना भाजपने संपर्क केलेल्या आमदारांची नावे उघड करण्याचे आव्हान दिले आहे. भाजपचे म्हणणे आहे की, आप असे बेताल आरोप करुन खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे.
मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पाचवे समन्सदरम्यान, दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांना पाचव्यांदा चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीने पाठवलेल्या समन्सला सूडाची कारवाई असल्याचे म्हटले होते. यापूर्वी, ईडीने 17 जानेवारी, 3 जानेवारी, 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना समन्स पाठवले होते, परंतु ते हजर झाले नाहीत. .