नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी मुख्य आरोप असलेला पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याला पोलिसांनी अटक केली. दीप सिद्धू याची चौकशी केली जात असून, दीप सिद्धू बिहारमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. (crime branch told accused deep sidhus bihar and california connection)
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप सिद्धू पंजाबमधून बिहारमध्ये फरार होण्याच्या तयारीत होता. बिहारमधील पूर्णिया येथे दीप सिद्धूची पत्नी आणि तिचे कुटुंबीय राहतात. दीप सिद्धूही तेथे जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याचवेळी विशेष पथकाने दीप सिद्धूला अटक केली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद
पोलिसांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या हिंसाचारानंतर दीप सिद्धू आपला मोबाइल बंद करून फरार झाला होता. यानंतर सोमवारी रात्री १०.३० वाजता दीप सिद्धूला करनाल येथून अटक करण्यात आले. रस्त्यावर एकटाच उभा असलेला दीप सिद्धू एका गाडीची वाट पाहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या हिंसाचारानंतर फरार झालेला दीप सिद्धू व्हिडिओ बनवत होता. मात्र, ते व्हिडिओ त्याची अतिशय जवळची एक महिला कॅलिफोर्निया येथून अपलोड करत होती. तपास संस्थेची दिशाभूल करण्यासाठी दीप सिद्धूने ही शक्कल लढवल्याचे सांगितले जात आहे.
प्रजास्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलकांना भडकवण्याचा आरोप दीप सिद्धूवर ठेवण्यात आला आहे. या आंदोलकांनी लाल किल्ल्यामध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात शेकडो कर्मचारी जखमी झाले होते. या सर्व हिंसाचारासाठी दीप सिद्धूला जबाबदार धरण्यात आले आहे. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.