एकीकडे देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा होत असताना हरियाणामधील पानीपत येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथील डिडवाडी गावामध्ये होळीदरम्यान काही मित्रांनी आपल्याच मित्रांना जाळण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हा आरोप केला आहे.
विकास नावाच्या तरुणाला जळाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याने सांगितले की, मी माझ्या मित्रांसह शेतात गेलो. तिथे सुमारे डझनभर लोक पार्टी करत होते. मी सर्वांची गळाभेट घेतली. गप्पा मारल्या. मात्र त्याचदरम्यान, त्यांनी माझ्यासह अन्य दोन तरुणांवर पेट्रोलचा स्प्रे मारून आग लावली. त्यानंतर आम्ही शेतातील तळ्यात उडी मारून आग विझवली. मात्र तोपर्यंत आमचा चेहरा आणि शरीर बऱ्यापैकी होरपळले होते. हा प्रकार घडल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाले.
पीडित विकासने सांगितले की, माझा कुणासोबतही वाद नव्हता. मात्र तरीही आरोपींनी माझं आयुष्य खराब केलं आहे. पीडित विकासने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर पीडित कुटुंबीयांनी सांगितले की, विकाससोबत अजून दोन तरुण आगीमध्ये होरपळले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता पीडितांच्या कुटुंबीयांनी आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली आहे. तसेच आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत डॉक्टरांनी सांगितले की, पीडित तरुण त्यांच्याकडे आला होता. त्याच्यावर त्वरित उपचार करण्यात आले. मात्र तोंडावर सूज असल्याने तो धोक्याचा बाहेर आहे की नाही याबाबत आताच काही सांगता येणार नाही. दरम्यान, डॉक्टरांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली आहे.