पंजाबमधील लुधियाना येथील साडे आठ कोटी रुपयांच्या दरोड्यातील मास्टरमाईंड असलेली सराईत महिला दरोडेखोर मनदीप कौर मोना हिला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी तिला उत्तराखंडमधील चमोली येथील हेमकुंड साहिब येथून बेड्या ठोकल्या. मोना तिथे मत्था टेकण्यासाठी गेली होती. तसेच तिचा पतीही तिथेच होता. एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून ५ कोटी ९६ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे साडे आठ कोटींच्या दरोड्यातील मास्टरमाईंड असलेली ही लेडी दरोडेखोर केवळ १० रुपयांच्या फुकटातील फ्रुटीच्या मोहापायी पोलिसांच्या तावडीत सापडली.
लुधियानामधील कॅश व्हॅनवरील दरोड्याच्या प्रकरणात मोना ही फरार होती. ती हेमकुंड साहिब येथे गेली होती. त्यानंतर केदारनाथ आणि हरिद्वार येथेही जाण्याचा तिचा प्लॅन होता. मात्र पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी फ्रीमध्ये फ्रुटी वाटपाची योजना आखली. मोना हेमकुंड साहिब येथे फ्रुटी घेण्यासाठी थांबली. तिथेच तिला पकडण्यात आले.
पोलिस आयुक्त मनदीप सिंग सिद्धू यांनी सांगितले की, मोना आणि तिचा पती नेपाळमार्गे परदेशात पळण्याच्या तयारीत होते. मात्र लुकआऊट नोटिस प्रसारित झाल्याने दोघेही असं करू शकले नाही. आमच्या पथकाने त्यांच्याकडून सुमारे २१ लाख रुपये जप्त केले आहेत. त्याबरोबरच मोनाचा सहकारी गौरव उर्फ गुलशन यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली.
१० जून रोजी लुधियाना येथील न्यू राजगुरूनगर परिसरामध्ये रात्री सुमारे दीड वाजता काही हत्यारबंद लोकांनी एका कॅश व्हॅनवर दरोडा घातला होता. त्या दरोड्यातून सुमारे ८ कोटी ४९ लाख रुपये लुटण्यात आले होते. ही कॅश व्हॅन घटनास्थळापासून सुमारे २० किमी अंतरावर सापडली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.