तब्बल २२ खून आणि अनेक गुन्ह्या प्रकरणी वाँटेड असलेला कुख्यात आरोपी वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांच्या तावडीत सापडल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमधील २२ हत्यांप्रकरणी मोस्ट वाँटेड असलेला कुख्यात आरोपी किशोर तिवारी उर्फ किस्सू याला अयोध्येमध्ये रामललांचं दर्शन घेताना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्यावर पोलिसांनी ५५ हजार रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. किस्सू याला पकडण्यासाठी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त मोहीम आखली होती.पोलीस सूत्रांनी सांगितले की, हत्येच्या आरोपामध्ये जामीन मिशाल्यानंतर फरार आरोपी किशोर तिवारी ऊर्फ किस्सूवर ५५ हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. तेव्हापासून पोलीस आरोपी किशोर तिवारी याचा पोलीस शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना चकवा देत होता.
जबलपूरचे पोलीस अधीक्षक आदित्य प्रताप सिंह आणि कटनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिजीत रंजन यांनी संयुक्त बैठकीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना किस्सू तिवारी याच्या अटकेचे आदेश दिले होते. यादरम्यान आरोपी लपून बसलेला असण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी धाड टाकण्याचे आदेश पोलिसांच्या पथकांना देण्यात आले होते. त्यासाठी खबऱ्यांची यंत्रणा सक्रिय करण्यात आली होती. तसेच ते आरोपीबाबत माहिती गोळा करत होते.
दरम्यान, किशोर तिवारी हा अयोध्येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो रामललांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत आला होता. त्यानंतर पोलिसांनी अयोध्येत घाड टाकून उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या. दरम्यान, फरार असतावना किस्सू तिवारी हा जयपूर, हरिद्वार, हिमाचल प्रदेश आदि ठिकाणी प्रवास करून आला होता.