वयाच्या ७२ व्या वर्षी प्लेबॉय होण्याची हौस एका वृद्धाला चांगलीच महागात पडली आहे. त्यांना प्लेबॉय बनवण्याचं आमिष दाखवून एका जोडप्यानं त्यांच्याकडून तब्बल ११ लाख रुपये उकळले. या प्रकरणी छत्तीसगडमधील दुर्ग पोलिसांनी कोलकात्यामधील एका प्रेमी जोडप्यासह पाच जणांना अटक केली आहे. ही टोळी लोकांना प्ले बॉय बनवण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत असे. या वृद्धालाही या टोळीने गंडा घातला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.
गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी या प्रेमी जोडप्यासह पाच जणांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जोडप्याचं सोमवारी लग्न होणार होतं. मात्र लग्नाची बेडी पडण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. दरम्यान, या टोळीने विविध राज्यातील हजाराहून अधिक लोकांना गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितलं की, पद्मनाभपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका वृद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्याने सांगितले की, २३ सप्टेंबर २०२२ रोजी मला एक मेसेज आला. हॅलो आय एम जेनी, प्लीज कॉल मी, असा त्यावर उल्लेख होता. त्यानंतर मी त्यावर फोन केला. तेव्हा फोनवर बोलणाऱ्या जोडप्याने मला डेटिंगसाठी मुली पुरवण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांच्याकडे नोंदणीसाठी २१४९ रुपये मागण्यात आले. त्यानंतर आयडी बनवण्यासाठी ३९९९ रुपये उकळण्यात आले. मात्र एवढं झाल्यानंतरही माझं कुठल्याही मुलीशी बोलणं करून देण्यात आलं नाही. जेव्हा मी हे पैसे परत मागितले तेव्हा त्यांनी त्यांना सिल्व्हर कार्ड बनवण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर गोल आणि ग्रीन कार्ड बनवण्याचे आमिष दाखवले. असं करून करून त्यांनी या वृद्धाकडून ११ लाख रुपये उकळले.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून फोन लोकेशन ट्रेस केले. तेव्हा हा नंबर कोलकात्यातील असल्याचे समोर आले. पोलिसांनी लगेच लोकेशनच्या मदतीने या जोडप्याला अटक केली. आरोपींची ओळख प्रिया मंडल आणि सौम्य ज्योतिदास अशी पटली आहे. मात्र त्यांनी पोलिसांसमोर वेगळीच कहाणी सांगितली.
या जोडप्यानं सांगितलं की, जेव्हा त्यांनी या वृद्धाला मेसेज पाठवला तेव्हा त्यांना या आजोबांचा फोन आला. या आजोबांनी आपणही प्ले बॉन बनू इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली. आम्हाला वाटले की, या आजोबांकडून पैसे उकळत राहू. त्यांनी तसंच केलं आणि हे वृद्ध ही एक ना ए दिवस आपण प्ले बॉय बनू या आशेने पैसे देत राहिले. मात्र तसं घडलंच नाही. सध्या पोलीस अटक केलेले आरोपी आणि वृद्धाचीही चौकशी करत आहेत.