भोपाळ - मध्य प्रदेशमधील कोठार गावामध्ये २० जानेवारी झालेल्या हत्येचं गुढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. ४० वर्षांच्या लल्लन सिंह याची हत्या त्याच्याच चुलत भावाने मित्रांच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे. लल्लन सिंह हा वासनांध होता. तसेच त्याची आरोपी घनश्याम याच्या कुटुंबातील महिलांवर वाईट नजर होती. त्यामुळे संतापून घमश्याम याने लल्लन सिंहची हत्या केली. आरोपींनी हा मृत्यू अपघाती असल्याचे दाखवण्यासाठी मृताच्या बाजूला विजेची तार सोडली होती. मात्र त्याच्या मृतदेहावर असलेल्या जखमांनी सारे गुपित उघडे केले. आरोपींनी लल्लन सिंह याची झोपलेला असताना विटांनी मारून हत्या केली होती. दरम्यान, पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.
सटनाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरेंद् कुमार जैन यांनी सांगितले की, २० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता पोलिसांना १०० क्रमांकावरून खेरिया कोठार गावामध्ये लल्लन नावाच्या व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमा असल्याने त्याची हत्या झाली असावी अशी शक्यताही वर्तवण्यात आली होती. पोलिसांनी याबाबत गांभीर्याने तपास सुरू केला. पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना मृत्यूचा प्रकार चुकीच्या पद्धतीने भासवल्याचे दिसून आले.
पोलीस अधिकारी जैन यांनी सांगितले की, मृताच्या चेहऱ्यावर ज्या जखमा होत्या, त्या विजेच्या धक्क्यामुळे आलेल्या नव्हत्या. तर हा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्यासारखे भासवण्यात आले होते. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हत्येची कलमे लावून तपास करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये भूपेंद्र सिंह, घनश्याम, लखन विश्वकर्मा आणि अभय राय यांनी लखन याची हत्या केल्याचे समोर आले. या चौघांनीही लल्लन हा झोपलेला असताना विटांनी मारून केली, असे तपासात उघड झाले.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली देताना पोलिसांना सांगितले की, मृत लल्लन सिंह हा वासनांध होता. त्याच्या या सवयीमुळे हे चौघेही त्रस्त होते. आरोपींनी त्याचा काटा काढण्यासाठी एक योजना आखली आणि त्याची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, घनश्याम हा मृत लल्लनचा चुलत भाऊ होता. मृताने घनश्यामच्या कुटुंबातील महिलांवर वाईट नजर टाकली होती. त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी ही हत्या घडवून आणली.