नवी दिल्ली - बिहारच्या औरंगाबादमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे चिडलेल्या सरपंच पदाच्या उमेदवाराने भयंकर कृत्य केलं आहे. आपल्या मतदारांना अत्यंत चुकीची वागणूक दिल्याची घटना आता समोर आली आहे. या उमेदवाराने मतदारांना जबरदस्तीने थुंकी चाटायला लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पंचायत निवडणुकीच्या दहाव्या टप्प्यांतर्गत कुटुंबा गटात झालेल्या पंचायत निवडणुकीत पराभव झाल्यामुळे उमेदवार प्रचंड चिडला आणि त्याने आपल्या भागातील मतदारांना बेदम मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या कुटुंबा ब्लॉकच्या सिंघना पंचायतीच्या खरांटी टोले भुइया येथील उमेदवार बलवंत सिंह यांनी निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपल्या मतदारांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांनी या मतदारांना थुंकी चाटायला लावली. कान पकडून उठा-बशा काढायला लावली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार प्रमाणात व्हायरल झाला असून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडली आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचे डीएम सौरभ जोरवाल आणि एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी या व्हायरल व्हिडिओची त्वरित दखल घेत अंबा पोलीस स्टेशनला एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक बलवंत सिंह याच्या या तालिबानी कृत्याने हैराण झाले आहेत.
व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी बलवंत सिंह म्हणत आहे की, त्याने निवडणुकीदरम्यान दोन मतदारांना पैसे दिले होते. मात्र पैसे देऊनही मतदान केले नाही. यात सिंह मतदारांना शिवीगाळ करताना, कान पकडून त्यांना शिक्षा करताना दिसून येत आहे. दुसरीकडे दोन्ही तरुण दारूच्या नशेत दंगा करत होते. त्यांना शांत करण्यासाठी आपण त्यांना शिक्षा केली असं सांगितलं. मात्र आरोपी पैसे देण्याबाबत बोलत असल्याचे व्हायरल व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.