छिंदवाडा - मध्य प्रदेशमधील न्यायालयाने एका खटल्यात 4 जणांची निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे वाघाच्या कातडीची तस्करी केल्याप्रकरणी वनविभागाने या जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यात 22 जुलै 2017 रोजी ही घटना घडली होती. त्यामध्ये, गुरैया रानीकामठ येथून चौघांना वाघाचं नकली कातडं विकण्याच्या प्रकरणात अटक केली होती. याप्रकरणी मुख्य न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
पोलिसांनी अटक केलेल्या संदीप उर्फ मोनू, राजेश विश्वकर्मा, रामकुमार आणि अभिजीत उर्फ मटरू यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 17 ऑक्टोबर 2017 रोजी स्कूल आफ वाईल्ड लाईफ फारेंसिक अँड हेल्थ संस्थेद्वारे ताब्यात घेतलेल्या कातड्याचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात हे कातडं वाघाचं नसून कुत्र्याचं आहे, असे म्हटले. संबंधित पोलीस पथकाने डिसेंबर 2021 रोजी न्यायालयात हा अहवाल सादर केला होता. त्यामुळे, संबंधित कातडी हे वाघाचे नसून कुत्र्याचं असल्याच्या आधारावर न्यायालयाने निकाल दिला. दरम्यान, वन्य प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत आरोपींवर लावण्यात आलेल्या आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.