नवी दिल्ली - ऑनलाईन व्यवहार करताना अनेकदा फसवणुकीची शक्यता असते. लोकांना विविध माध्यमातून हॅकर्स आपल्या जाळ्यात ओढत असतात. त्यामुळे वेळीस सावध असणं गरजेचं आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. SBI अधिकारी असल्याचं सांगून 200 जणांना गंडा घातल्याची माहिती मिळत आहे. जस्ट डाईलवरुन ग्राहकाची माहिती घेऊन हा प्रकार केला जात होता. पोलिसांनी लोकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. यामध्ये पोलिसांनी 35 मोबाईल, 109 सिम कार्ड, 15 ATM कार्ड आणि 22 लाखांहून अधिक रक्कम जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) अधिकारी असल्याची बतावणी करत ही टोळी लोकांना लुबाडत होती. विशेष म्हणजे, फसवणूक करण्यासाठी हे लोक एसबीआयच्या कस्टमर केअर क्रमांकाचा वापर करत होते. पोलीस आयुक्त विकास अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने आतापर्यंत सुमारे 200 लोकांची फसवणूक केली होती. हे लोक एसबीआयच्या ग्राहकांची माहिती जस्ट डायल या वेबसाईटवरून मिळवत. त्यानंतर एका ॲपच्या मदतीने ते एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांना फोन करत. या ॲपमुळे लोकांना एसबीआयच्या कस्टमर केअरवरून फोन आला आहे असं वाटायचं.
लोकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या कार्डचा नंबर (Credit Card number), सीव्हीव्ही क्रमांक (CVV Number) आणि एक्सपायरी डेट इत्यादी माहिती त्यांच्याकडून घेतली जायची. या माहितीच्या आधारे क्रेडिट कार्डवर असणारी रक्कम आरोपी आपल्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करुन घेत. पोलीस उपायुक्त नितीश अग्रवाल यांच्या निर्देशांनुसार, एसीपी क्राइम सुरेंद्र श्योराण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. सोनवीर, अमन, शक्ती, राहुल, पंकज, अब्दुल्ला आणि शुभान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
35 मोबाईल, 109 सिम कार्ड, 15 ATM कार्ड अन् 22 लाख
लोकांना आरोपी जुन्या क्रेडिट कार्डची लिमिट नव्या कार्डवर ट्रान्सफर करण्याचे आमिष (SBI दाखवत होते. त्यानंतर त्यांना हवी ती माहिती मिळाली, की लोकांच्या खात्यावरील रक्कम काढून घेत होते. त्यांच्याकडून 35 मोबाईल फोन, 109 सिम कार्ड, 15 एटीएम कार्ड, 22 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. चौकशीमध्ये आरोपींनी 17 बँक खात्यांची माहिती दिली. या खात्यांची तपासणी केली असता, त्यामधून जवळपास 1.25 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. आज तकने याबाबतचे वृत्त दिले आहे.