झारखंडमधून गुन्ह्याची एक अजब घटना समोर आली आहे. एका तरुणाचं लग्न ठरलं होतं. शेजारी-पाजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यामध्ये पत्रिका वाटल्या गेल्या. दोन दिवसांमध्ये धुमधडाक्यात विवाह होणार होता. अनेक नातेवाईकही पोहोचले होते. वधू आणि वर पक्षाकडून विवाहाच्या तयारीला अंतिम रूप दिलं गेलं होतं. दोन्ही ठिकाणी भव्य मंडपासह लग्नाचा मंडपही बांधून तयार झाला होता. लग्नावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला होता. मात्र लग्नाला दोन दिवस उरले असतानाच पोलिसांनी नवरदेवाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि सर्व आनंदावर विरजण पडले.
सायबर गुन्ह्यांच्या आरोपांखाली पोलिसांनी या नवरदेवाला अटक करून त्याची तुरुंगात रवावनी केली. देवघर जिल्ह्यातील सरवा नारंगी येथे त्याचा विवाह निश्चित झाला होता. आलिशान एमजी हेक्टरमधून फिरणाऱ्या सोनू वर्मा या नवरदेवाला लग्न ठरवताना वधू पक्षाच्या लोकांनी त्याच्या व्यवयायाबाबत विचारलं तेव्हा त्याने आपण आयटी इंजिनियर असल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सोनू याने वयाच्या अठराव्या वर्षी सायबर गुन्ह्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला. तसेच लवकरच तो या काळ्या दुनियेतील सराईत गुन्हेगार बनला. या माध्यमातून त्याने अमाप संपत्ती गोळा केली. अटकेची कारवाई केल्यानंतर त्याने पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ३.५ कोटी रुपयांची मालमत्तेची ओळख पटवून ती जप्त करण्यासाठी सरकारकडे परवानगीची मागणी केली आहे.
तसेच आता सखोल चौकशीनंतर आरोपी नवरदेवाला पोलिसांनी तुरुंगात पाठवलं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक महागडा मोबाईल, लॅपटॉप, तसेच सायबर गुन्हेगारीमधून गोळा केलेली अमाप संपत्ती आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.