नवी दिल्ली - ग्रामीण भागात गावकडे बस स्थानकावर एखादी व्यक्ती प्रवाशांना पैसे मागत असल्याचं आपण पाहिलं असेल. माझी पिशवी चोरीला गेलीय, पाकिट चोरीला गेलंय. मला गावाकडं जायला पैसे नाही, कृपया मदत करा, अशी विनवणी या व्यक्तींकडून करण्यात येत. मात्र, चक्क दिल्लीविमानतळावरही असा ठग असल्याचं उघडकीस आलं आहे. दिल्लीच्या विमानतळावरुन सोमवारी पोलिसांनी एकास अटक केली आहे. आपलं विमान निघून गेल्याचं सांगत तो प्रवाशांकडून पैसे घेत होता.
पोलिसांनी अटक केलेला युवक हा आंध्र प्रदेशमधील एका नामवंत विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे सांगत. तसेच, माझे विमान चुकल्याचे तो प्रवाशांना सांगून त्यांच्याकडून मदतीची मागणी करत पैसे ठगत होता. दिनेश कुमार असे या युवकाचे नाव असून तो आंध्र प्रदेशातील गंटुरचा रहिवाशी आहे. विशेष म्हणजे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून तो विमानतळावर प्रवाशांना लुटत होता. आत्तापर्यंत त्याने जवळपास 100 पेक्षा अधिक प्रवाशांची लुट केल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणून दिले आहे.
याप्रकरणी मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या पीजी मेन्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने 19 डिसेंबर 2021 रोजी तक्रार दिली होती. बडोद्याहून दिल्लीत आल्यानंतर विमानतळावर आरोपीने संबंधित व्यक्तीला संपर्क साधत आपण आंध्र प्रदेशातील एका विद्यापीठाचा विद्यार्थी असून आपले विमान मीस झाल्याचं सांगितलं होतं. तसेच, मी चंडीगढ येथून आलो असून विशाखापट्टनमला जाणारं विमान निघून गेलं. त्याने 15 हजार रुपयांचे तिकीटही दाखवले होते, तसेच आता माझ्याकडे केवळ 6500 रुपये असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे, तक्रारदाराने 9500 रुपये गुगल पेवरुन पाठवत या युवकाला मदत केली होती. विशेष म्हणजे युवकाने हे पैस परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पैसे परत न मिळाल्याने पोलिसात तक्रार दाखल केली.
दरम्यान, विमानतळावरील पोलीस उपायुक्त संजीव त्यागी यांनी सांगितले की, सीसीटीव्हीच्या आधारे 30 डिसेंबर रोजी टर्मिनल्स 2 वरुन संशयित आरोपीला पकडण्यात आले. विशेष म्हणजे यापूर्वीही 5 जणांना त्याविरुद्ध तक्रार दाखल केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.