छत्तीसगडमधील कांकेर येथे रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झालेल्या एका कुटुंबाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, विमा पॉलिसीचे ७२ लाख रुपये मिळवण्यासाठी या व्यक्तीने संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूचा बनाव रचला होता. कारण त्याच्यावर २५ लाख रुपयांचं कर्ज होतं. पोलिसांनी संपूर्ण कुटुंबाला शोधून काढलं आहे. तसेच आरोपीला अटक केली आहे.
पखांजूर येथील रहिवासी समिरन सिकदार याला व्यवसायात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. तसेच तो पूर्णपणे कर्जबाजारी झाला होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याने एक डाव रचला. त्याने १ मार्च रोजी कांकेरमध्ये त्याच्या नव्या कारला आग लावली. तसेच अपघातात आपली पत्नी आणि मुलांचा मृत्यू झाला हे दाखवण्यासाठी १३ दिवस कुटुंबासह बेपत्ता झाला. त्याने यादरम्यान पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवले.
दरम्यान, २ मार्च रोजी त्याने आपल्या कुटुंबासह धमतरी शहरात एका लॉजमध्ये रुम घेतला. तसेच एक दिवस तिथेच राहिला. यादरम्यान, कांकेर पोलिसांना बेपत्ता झालेले चार जण लॉजमध्ये दिसल्याची खबर मिळाली. त्यानंतर पोलिसांना सातत्याने या कुटुंबाचा शोध सुरू केला. मात्र आरोपी समीरन सिकदार त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांसह पश्चिम बंगालमधून बिहारमध्ये पोहोचला. तसेच १३ दिवसांपर्यंत आपल्या मोबाईल फोनला घटनास्थळी फेकून पोलिसांची दिशाभूल करत राहिला.
समीरन सिकदारला शोधण्यासाठी पोलिसांनी ९ लाखांहून अधिक मोबाईल नंबर आणि एक हजारांहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. जेव्हा आपण जिवंत असल्याचे समजून पोलीस शोध घेत आहेत, हे समजले तेव्हा तो घरी आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने पोलिसांना सांगितले की, तो पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करतो. त्याने त्याच्यावर २५ लाख रुपयाचं कर्ज असल्याने विम्याचे ७२ लाख रुपये घेण्यासाठी हा बनाव रचला होता.
एक मार्च रोजी चारामा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोरर मार्गावर एक जळालेली कार सापडली होती. कार जळाल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. फॉरेंसिक तपासामद्ये कारमध्ये मानवी अवशेष सापडले नव्हते. मात्र कारमधून दोन जलालेले मोबाईल मिळाले होते. त्यामुळे पोलिसांना काहीतरी कटकारस्थान असल्याचा संशय आला होता. त्या दिशेने त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली होती.