नवी दिल्ली - ट्रॅफिक पोलीस हे लोकांनी वाहतुकीचे नियम मोडले की त्यांना दंड ठोठावतात. त्यांची गाडी जप्त करतात. एका व्यक्तीकडे गाडीची कागदपत्र मागणं पोलिसांना आता चांगलंच महागात पडलं आहे. कारण यामुळे पोलिसाचंच अपहरण झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडामध्ये एका व्यक्तील पोलिसाने अडवलं आणि त्याच्याजवळ गाडीची कागदपत्र मागितली. यावर संतापलेल्या व्यक्तीने थेट पोलीस कर्मचाराचं अपहरण केलं.
पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण करुन त्याला गाडीमधून फिरवून आणत नंतर एका निर्जनस्थळी सोडून देण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे फक्त गाडीच्या कागदपत्रांची विचारपूस केल्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्याचं त्या व्यक्तीने अपहरण केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. हा सर्व प्रकार सूरजपूरमध्ये परिसरामध्ये घडल्याची माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका वाहतूक पोलीसने नेहमीप्रमाणे गाडीच्या तपासणीदरम्यान एका व्यक्तीला थांबवून गाडीची कागदपत्र मागितली.
शोरुममधून गाडी चोरी केल्याची शक्यता
गाडीची कागदपत्र मागणाऱ्या पोलीस हवालदाराला चालक सचिन रावलने कागदपत्र पाहण्यासाठी गाडीत बसा असं सांगितलं. पोलीस कर्मचारी गाडीमध्ये शिरल्यानंतर त्याने वेगाने गाडी सुरू करत मिळेल त्या वाटेने जाण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी गाडी अडवलेली तिथून दहा किलोमीटरवर जाऊन सचिनने या पोलीस कर्मचाऱ्याला गाडीतून खाली धक्का दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने गुरुग्राममधील एका शोरुममधून गाडी चोरी केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी माहितीच्या आधारेच सचिनला तपासणीसाठी थांबवलं होतं. ही गाडी दोन वर्षांपूर्वी चोरली होती. टेस्ट ड्राइव्हला जातो सांगून एका शोरुममधून ही गाडी लंपास करण्यात आलेली असं म्हटलं आहे.
विरेंद्र यांनी फोन करुन पोलिसांना दिली माहिती
पोलीस कर्मचारी विरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन चालवत असणारी मारुती स्विफ्ट डिझायर गाडी चौकशीसाठी थांबली आणि सचिनकडे कागदपत्रं मागितली. त्यावर सचिनने माझ्या मोबाईलमध्ये परिवहनच एप असून तुम्ही गाडीत बसा मी तुम्हाला त्यावर कागदपत्र दाखवतो असं सांगितलं. मात्र विरेंद्र गाडीत बसल्यावर सचिनने सेंट्रलाइज लॉक लावून गाडी दहा किलोमीटरपर्यंत नेली. त्यानंतर विरेंद्र यांनी फोन करुन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.