केरळमधील कोट्टारक्कारा येथील एका रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णानेच महिला डॉक्टरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या रुग्णाने २२ वर्षीय महिला डॉक्टरची चाकूने सपासप वार करून हत्या केली. आरोपी व्यक्तीला कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्यानंतर पोलीस रुग्णालयात घेऊन आले होते. कोट्टारक्कारा पोलिसांतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिला डॉक्टर जेव्हा आरोपीच्या पायावरील जखमेवर ड्रेसिंग करत होती. तेवढ्यात आरोपी चेकाळला आणि त्याने तिथे उपस्थित असलेल्या लोकांवार चाकू आणि कैचीने हल्ला केला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही महिला डॉक्टर हल्ल्यात गंभीर जखमी झाली. तसेच या आरोपीने केलेल्या हल्ल्यात त्याला रुग्णालयात घेऊन आलेले पोलीस कर्मचारीही जखमी झाले. जखमी झालेल्या महिला डॉक्टरला तिरुवनंतपुरममधील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती देताना कोट्टारक्कारा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्यानंतर स्वत:ला वाचवण्यासाठी आपातकालीन नंबरवर फोन केला होता.
त्यांनी सांगितले की, घटनास्थळावर पोहोचलेले पोलीस आरोपीला जखमी अवस्थेमध्ये तालुका रुग्णालयात घेऊन आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने मद्यपान केलं होतं. तसेच त्याला रुग्णालयात घेऊन गेल्यावर तो हिंसक झाला. तो महिला डॉक्टरसोबत एकटाच होता. आम्हाला खोलीत जाण्याची परवानगी नव्हती. डॉक्टर आरोपीला मलमपट्टी करत होती. तेवढ्यात त्याने हल्ला केला. दरम्यान, हिंसक झालेल्या आरोपीवर पोलिसांनी कसेबसे नियंत्रण मिळवले.
दरम्यान, आरोपीविरोधात भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महिला डॉक्टरच्या मृत्यू झाल्याने आता हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येईल.