नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान राजस्थानमध्ये एक घटना घडली आहे. भीतीने एका विद्यार्थ्याचा जीव घेतला आहे. आई-बाबांना घाबरून 10 वीच्या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. राजस्थानमधील झुंझुनूंमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पालकांच्या भीतीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून क्लास बंक करीत होता आणि याबाबत घरातील सदस्यांना माहिती मिळाली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
भूपेंद्र (17) असं या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून त्याचा मृतदेह एका खासगी शाळेच्या परिसरात दिसला. घटनेची माहिती मिळताच डेप्युटी शंकरलाल छाबा घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. भूपेंद्र हा टागोर पब्लिक स्कूलमध्ये शिकत होता. पोलिसांना कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूपेंद्र बऱ्याच दिवसांपासून शाळेत जात नव्हता. याबाबत पालकांना कळालं तेव्हा त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांशी बोलण्याचं ठरवलं.
10 वीच्या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं; आत्महत्या करून जीवन संपवलं
भूपेंद्रला हे समजताच तो खूप घाबरला आणि त्याने आत्महत्या केली. भूपेंद्रचा मोठा भाऊ रिक्षा चालवत होता. त्या दिवशी गावातून भूपेंद्र रिक्षातून भावासोबतच आला होता. रस्त्यात मध्येच थांबवून त्याने भावाला मित्राकडे जायचं असं सांगितलं आणि तो रिक्षातून खाली उतरला. सकाळी शाळेत जाणार असल्याचंही त्याने आपल्या भावाला सांगितलं. यानंतर सायंकाळी भूपेंद्रने आत्महत्या केल्याचं समोर आलं. या घटनेने भूपेंद्रच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वात आधीत भूपेंद्रला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. विद्यार्थी कॅन्टीनच्या दिशेने जात होते. तेव्हा एका झाडावर भूपेंद्र लटकलेल्या अवस्थेत दिसला. विद्यार्थ्यांनी तातडीने शाळेच्या व्यवस्थापनेला याबाबत माहिती दिली. यानंतर शाळा व्यवस्थापकांनी पोलिसांना सूचना दिली. शेवटी पोलिसांनी भूपेंद्रच्या कुटुंबीयांना त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.