घरातील मौल्यवान वस्तू दागदागिने चोरीस गेल्यानंतर ते परत मिळवणं फार कठीण होऊन बसतं. मात्र राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये एका महिलेच्या घरातून दागदागिने चोरून नेणाऱ्या चोरट्यांनी हा ऐवज १५ दिवसांत घराच्या आवारात पुन्हा आणून ठेवल्याची अजब घटना समोर आली आहे. २५ ऑक्टोबर रोजी ओटीएसमध्ये पब्लिकेशन ऑफिसर असलेल्या महिलेच्या घरातून चोरांनी ५० तोळे सोनं घेऊन पोबारा केला होता. मात्र या घटनेला १५ दिवस होत असतानाच चोरांनी चोरलेल्या सोन्यापैकी जवळपास ३५ तोळे सोनं परत केलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना पकडलं होतं. त्यानंतर महिलेला पोलीस ठाण्यात बोलावलं असता या महिलेने जादुटोण्यावरून चोरांना काही इशाा दिला. त्यामुळे चोर घाबरले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी ३५ तोळे सोनं एका पर्समध्ये भरून महिलेच्या घराबाहेर फेकले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पब्लिकेशन ऑफिसर डॉ. अमृत कौर यांच्या घरामध्ये चोरी झाली होती. ही घटना घडली तेव्हा त्या घरात नव्हत्या. जेव्हा त्या घरात आल्या, तेव्हा त्यांना घरातील सामान विखुरलेलं दिसून आलं. त्यांनी कपाटामध्ये पाहिलं असता तिथे ठेवलेलं ५० तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये चोरी झाल्याचं समोर आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. तसेच संशयाचा आधारावर तीन जणांना ताब्यात घेतले. मात्र त्यांनी चोरी कबूल केली नाही. पोलिसांकडेही कुठलाही पुरावा नव्हता. मात्र संशयाच्या आधारावर पोलिसांनी त्यांना पकडून पीडित महिलेलाही पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. त्यावेळी या महिलेने जादुटोण्यामुळे मला चोरी कुणी केली आहे, ते समजलं आहे, असं चोरांना सांगितलं. तसेच तंत्रमंत्राने पाण्यात चोरांचा चेहरा पाहिला आहे, असं सांगितलं. त्यानंतर चोर घाबरले. पोलिसांनी काही पुरावा नसल्याने त्यांना सोडले. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी सगळे दागिने पाकिटात भरून महिलेच्या घराच्या आवारात आणून टाकले.