आधी एक मृतदेह, त्यानंतर आणखी एक मृत्यू आणि त्यानंतर आणखी एक मृतदेह. बारा दिवसांमध्ये एकापाठोपाठ एक तीन रशियन नागरिकांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. योगायोग म्हणजे हे तिन्ही मृतदेह ओदिशामध्ये मिळाले. त्यातील दोन मृतदेह हे हॉटेलमध्ये तर तिसरा मृतदेह हा जहाजावर सापडला. या मृतदेहांचं रहस्य जेवढं गुंतागुंतीचं आहे. तेवढीच या मृत्यूंबाबतची कहाणीही गुंतागुंत वाढवणारी आहे.
एखाद्या हेरकथेसारखी कहाणी ओदिशामधून समोर येत आहे. या तिन्ही मृत्यूंमागे असं काही कनेक्शन आहे ज्याकडे दुर्लक्ष करता येणारे नाही. पहिला मृत्यू हा हॉटेलच्या खोलीत होतो. हृदयविकाराच्या धक्क्याने हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरा मृत्यू हा हॉटेलशेजारी बांधाकाम सुरू असलेल्या इमारतीत सापडला. मरणाऱ्या व्यक्तीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. मात्र एवढ्या उंचावरून पडूनही या व्यक्तीच्या शरीरावर कुठल्याही जखमा नव्हत्या तसेच मृतदेहातून रक्तस्त्राव झालेला नव्हता. त्यानंतर दहा दिवसांनी अचानक तिसरा मृतदेह सापडला. हा मृतदेह हॉटेलपासून दूर एका जहाजावर सापडला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ओदिशामधील रायगढमध्ये २२ आणि २४ डिसेंबर रोजी दोन मृतदेह सापडले होते. दोन्ही मृत्यू जेवढे रहस्यमय होते. तेवढीच त्यानंतर अवलंबलेली प्रक्रिया संशयास्पद होती. हे मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या स्मशानात नेण्यात आले. तसेच ख्रिश्चन रीतीरिवाजानुसार दफन न करता दहन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच पोस्टमॉर्टेमनंतर पोलिसांन व्हिसेरा सॅम्पलही ठेवलं नाही.
आता या मृत्यूंबाबत संशय बळावला असून, यामधील एका मृत्यूची रशिया, अमेरिका, ब्रिटनपासून संपूर्ण युरोपमध्ये चर्चा होत आहे. हा मृत्यू आहे रशियातील अतिश्रीमंत व्यावसायिक आणि खासदार पावेल अँटोव्ह यांचा. ते व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक होते. त्यांच्या मृत्युनंतर रशियाच्या दिशेने संशयाची सुई वळत आहे. हे मृत्यू नैसर्गिक आहेत की यामागे काही कट आहे, असा सवाल विचारला जात आहे. आता ओदिशा सरकारने या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवला आहे. मात्र या मृत्यूंमागे काही कटकारस्थान असल्याची शक्यता रशियन वकिलातीने फेटाळून लावली आहे. तरीही अँटोव्ह यांच्या मृत्यूबाबत जगभरातून संशय व्यक्त होत आहे.