छत्तीसगडमधील महासमुंद येथील पोलिसांनी एका विवाहित महिलेच्या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. मृत महिलेच्या पतीला हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी हत्येचा कट एवढा बारकाईने रचला की, दोन वर्षे तपास केल्यानंतरही पोलिसांना यश मिळत नव्हते.
या खुनी खेळाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली होती. वेळ निघून जात होता. त्याचदरम्यान, अनैतिक संबंधांच्या एंट्रीने सगळे गुपित उघड केले. पोलीस अधीक्षक धर्मेंद्र सिंह यांनी जुन्या प्रकरणांच्या निराकरणाचे आदेश दिले होते. याच क्रमवारीमध्ये २ वर्षांपूर्वी झालेल्या संतोष यादव हत्याकांडाचा उलगडा करताना पोलिसांनी महिलेचा पती परमानंद यादव याला अटक केली.
पोलिसांच्या तपासामध्ये मृत महिलेचा पती परमानंद यादव याचे गावातीलच एका महिलेसोबत दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. याची माहिती त्याच्या पत्नीला समजल्यापासून ती दररोज पतीला हे संबंध संपुष्टात आणण्याबाबत बजावत होती. त्यावरून त्या दोघांमध्ये भांडणंही होत होती. दररोजच्या भांडणांना वैतागून या व्यक्तीने पत्नीच्या हत्येचा कट रचला. आरोपीने ही घटना घडण्यापूर्वी २० दिवस आधी पत्नीच्या नावाने टर्म लाइफ इन्शोरन्सही करवून घेतला. त्यामाध्यमातून पत्नीचा मृत्यू झाल्यास त्याला १६ लाख रुपये मिळणार होते. अशा प्रकारचा कट रचून त्याने पत्नीची हत्या घडवून आणली.
पोलीस अधीक्षक धर्मेंद्र सिंह यांनी सांगितले की, आरोपी आधी आपल्या भावाच्या घरी महासमुंद येथे गेला. त्यानंतर तो भावासोबत बम्हनी गावात पोहोचला. तिथे त्याने त्याच्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर आरोपी परमानंद यादव बम्हनी येथून पुन्हा महासमुंद येथे आला. त्यानंतर तो सातत्याने पोलिसांची दिशाभूल करत होता. आरोपी लाइफ इन्शोरन्स क्लेम करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी करायचा. तो जेव्हा पोलीस ठाण्यात यायचा तेव्हा केस क्लोज केली काय, अशी विचारणा करायचा. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी कसून चौकशी केली असता अखेर आरोपींचे बिंग फुटलेय. त्यानंतर पोलिसांनी सर्व प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला बेड्या ठोकल्या.