नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये नेहमीच विविध गोष्टींवरून भांडणं होत असतात. कधी कधी ही भांडणं विकोपाला देखील जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. पती, सासूच्या टोमण्याला वैतागून पत्नीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी बायकोने स्वतःच्याच घरात डल्ला मारला असून आपल्या भावासोबत कट रचला आहे. महिलेने आपल्या एका भावाच्या मदतीने घरातच चोरी केल्याचं तपासात उघड झाले असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डमधून या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. महिलेकडे जवळपास 78 हजार 300 रुपये रोख रक्कम, सोन्याचा हार, अंगठीसह अन्य काही दागिने सापडले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीला धडा शिकवण्यासाठी महिलेने स्वतःच्याच घरात चोरी केली आहे. दिल्लीच्या द्वारका परिसरात गोपाळ नगरमध्ये ही घटना घडली होती. रवी हा आपल्या कुटुंबीयासोबत राहतो. घरातून रोकड आणि दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार त्याने पोलिसांत दिली होती. बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून चोरीचा घटनेचा उलगडा केला. पोलिसांनी तपासादरम्यान, घराच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्हीमधील फुटेज तपासले. तसेच तांत्रिक मदतही घेतली.
नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी बायकोने स्वतःच्याच घरात मारला डल्ला
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती संशयास्पद पद्धतीने नजफगढ येथून द्वारका वळणापर्यंत रिक्षातून गेल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने महत्वाची माहिती दिली. दरम्यान, तांत्रिक मदत आणि कॉल डिटेल्स तपासल्यानंतर संशयित हा तक्रारदाराच्या पत्नीच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. चौकशी केली असता ती संशयित व्यक्ती पत्नीचाच भाऊ असल्याचं समोर आलं. त्यानंतर संशयावरून पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
भावासोबत 'असा' रचला कट
पतीसोबत खूश नव्हते. पती आणि सासू नेहमीच टोमणे मारायचे. त्यांना धडा शिकवण्यासाठी चुलत भाऊ गिरीराज याच्यासोबत घरातच चोरी करण्याचा कट आखला. घटनेच्या दिवशी त्याला बोलावून घेतले. गिरीराजने घरात चोरी केली. रोकड आणि दागिने घेऊन तो पसार झाला. आरोपी हा राजस्थानमधील दौसा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीकडून 78 हजार 300 रुपये आणि सोन्याचे दागिने जप्त केले असून अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.