नवी दिल्ली - नव्वदच्या दशकाच्या अखेरीस लोकप्रिय 'इंडियाज मोस्ट वाँटेड' शोचे सुत्रसंचालन करुन प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सुहेब इलियासीला पत्नीच्या हत्येप्रकरणी 17 वर्षानंतर न्यायालयानं दोषी ठरवलं असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुहेब इलियासीचं सूत्रसंचालन, दिग्दर्शन आणि निर्मिती असलेला 'इंडियाज मोस्ट वाँटेड' हा क्राईम शो 1998 मध्ये चांगलाच लोकप्रिय ठरला होता. तब्बल 30 गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी पोलिसांना मदत करणारा हाच सुहेब पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरला आहे. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील हा पहिला वहिला क्राईम शो मानला जातो. झी टीव्हीवर सुरु झालेल्या 'इंडियाज मोस्ट वाँटेड'ची निर्मिती सुहेब इलियासीची. अँकरिंगच्या अत्यंत आगळ्यावेगळ्या शैलीमुळे सुहेब इलियासी आणि हा शो लोकप्रिय झाला होता. एखाद्या टीव्ही शोच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे पोलिसांसाठीही हा कार्यक्रम चांगलात फायदेशीर ठरला होता.
काय होतं प्रकरण - 1989 मध्ये अंजू आणि साहेब एकत्र शिकत होते. त्यावेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अंजूच्या कुटुंबाचा दोघांच्या नात्याला विरोध होता. विरोधानंतरही 1993 मध्ये दोघांनी लंडनमध्ये लग्न केलं. मात्र सातच वर्षात दोघांच्या नात्यात कटुता यायला सुरुवात झाली. अखेर 11 जानेवारी 2000 रोजी सुहेबची पत्नी अंजू इलियासीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. सुहेबने आधी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला. अंजूचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचा बनाव त्याने केला, मात्र 17 वर्षांनी दिल्लीतील कनिष्ठ कोर्टाने अंजूच्या हत्येप्रकरणी सुहेबला दोषी ठरवलं. सुहेबने पत्नीच्या मृत्यूची बातमी सर्वात आधी आपल्या मित्राला दिली होती. तिने आत्महत्या केल्याचं सुहेबने सांगितलं. मात्र अंजूच्या कुटुंबीयांना याबाबत समजताच त्यांचं पित्त खवळलं. अंजू आत्महत्या करुच शकत नाही, तिच हत्या झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. मार्च 2000 मध्ये सुहेबला हुंडा आणि हत्येच्या आरोपातून बेड्या ठोकण्यात आल्या. काही दिवसांतच तो जामिनावर बाहेर आला. अंजूच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेतली. 2014 मध्ये हत्येच्या आरोपाखाली तपास करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले. कात्रीने वार करुन अंजूची हत्या झाल्याचं समोर आलं. दोघांमध्ये अनेक वेळा खटके उडत असल्याचं समोर आलं. सर्व पुरावे पाहून कोर्टाने सुहेब इलियासीला अंजूच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं.