Crime: ट्रेनमध्ये प्रवाशांना जिवंत जाळणारा आरोपी सापडला रत्नागिरीत, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 10:54 AM2023-04-05T10:54:52+5:302023-04-05T10:56:26+5:30
Kerala Train Fire : केरळमधील एका ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान, आग लावून ३ प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.
केरळमधील एका ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान, आग लावून ३ प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात फरार असलेला आरोपी शाहरुख सैनी याला पोलिसांनी रत्नागिरीत अटक केली आहे. सेंट्रल इंटेलिजन्स आणि महाराष्ट्र एटीएस यांच्या संयुक्त पथकाने रात्री उशिरा रत्नागिरी रेल्वेस्टेशन जवळून त्याला अटक केली.
अलप्पुझा आणि कन्नुर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये २ एप्रिल रोजी रात्री सुमारे ९.४५ च्या दरम्यान, कोझिकोड शहर ओलांडल्यानंतर कोरापुझा रेल्वे पुलावर ट्रेन पोहोचली असताना आरोपी शाहरुख सैफी याने सहप्रवाशांवर एक ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिले. या घटनेत एक एक वर्षाच्या मुलासह, एक महिला आणि एक अन्य व्यक्ती अशा तीन जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह रेल्वे रुळावर सापडले होते. तर इतर ८ प्रवासी जखमी झाले होते.
आरोपी शाहरुख सैफी याचं लोकेशन रत्नागिरीत असल्याचं तपास यंत्रणांना समजलं होतं. तो डोक्यावर झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला ही जखम केरळमध्ये ट्रेनमधून खाली उडी मारताना झाली होती. मात्र तो पूर्ण उपचार घेण्याआधीच रुग्णालयातून पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी रत्नागिरीत शोधमोहीम हाती घेऊन आरोपी शाहरुखच्या मुसक्या आवळल्या. सध्या तो रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे. तसेच केरळ पोलीसही दाखल झाले आहेत.
आरोपी शाहरुख हा नोएडामधील असल्याचे समोर आले आहे. त्याने ट्रेनमधून प्रवास करताना सहप्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिले होते. त्यात काही प्रवासी जखमी झाले होते. त्यानंतर इतर प्रवाशांनी चेन खेचून ट्रेन थांबवली. मात्र आरोपी ट्रेनमधून उडी मारून अंधाराचा फायदा घेत फरार झाला होता. या दरम्यान, ट्रेनमधील एक महिला आणि एक मुलगा बेपत्ता असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी तपास केला असता रुळांवर तिघांचे मृतदेह सापडले होते.