बिहारमधील पाटणामध्ये तीन कैदी पोलिसांच्या डोळ्यात झंडू बाम चोळत पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे कैदी फुलवारीशरीफ तुरुंगात बंद होते. त्यांना सिव्हिल कोर्टामध्ये हजर करण्यासाठी आणण्यात आलं होतं. मात्र कोर्टामध्ये पोहोचण्यापूर्वीच हे तीनही कैदी पोलिसांना झंडू बाम चोळत फरार झाले. या घटनेनंतर पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. फरार कैद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरामध्ये सर्च ऑपरेशन चालवण्यात आलं. ही घटना गुरुवारी दुपारी २.४५ च्या सुमारास घडली.
पाटणा टाऊनचे डीएसपी अशोक कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार फुलवारीशरीफ तुरुंगातील ४३ कैद्यांना घेऊन एक वाहन पाटणा सिव्हिल कोर्टामध्ये जात होते. पाटणा सिव्हिल कोर्टाआधी बीएन कॉलेजजवळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. येथे एक ई-रिक्षा आणि दुचाकीस्वारामध्ये रस्त्यावर भांडण सुरू होते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
या वाहनात असलेल्या ४३ कैद्यांसोबत पाच पोलीस कर्मचारीसुद्धा या कोंडीमध्ये अडकले होते. त्यामुळे दोन पोलीस कर्मचारी बाहेर उतरून ट्रॅफीक हटवण्याचं काम करू लागले. यादरम्यान संधीचा फायदा घेऊन तीन कैदी फरार झाले.
डीएसपी अशोक कुमार सिंह यांनी या घटनेसाठी कैदी वाहनांमध्ये तैनात पोलीस कर्मचाऱ्यांच्या बेफिकिरीला जबाबदार धरले आहे. त्यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पळून गेलेल्या कैद्यांची ओळख नीरज चौधरी, सोनू शर्मा आणि सोनू कुमार अशी पटली आहे.अशोक कुमार सिंह यांनी पुढे सांगितले की, फरार कैद्यांकडे झंडू बाम होता. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांवर झंडू बाम चोळला. त्यामुळे पोलिसांना दिसणं बंद झालं. त्याचा फायदा घेत हे कैदी फरार झाले.