नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले ४३ आमदार असे आहेत ज्यांच्या विरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरणे दाखल आहेत. यातील २६ आमदार तर असे आहेत ज्यांनी स्वच्छ प्रतिमेच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला हरविले.ही माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि दिल्ली इलेक्शन वॉचने दिली आहे. या अहवालानुसार, राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीत एकूण ५२ करोडपती उमेदवार निवडून आले. यातील १५ जणांनी बिगर करोडपती उमेदवारांचा पराभव केला आहे. एडीआरच्या अहवालानुसार, स्वच्छ प्रतिमेच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना हरवून जिंकलेल्या २६ पैकी ९ आमदारांनी २० टक्क्यांपेक्षा अधिक फरकाने विजय मिळविला आहे. आपचे बुराडीचे आमदार संजीव झा यांनी प्रतिज्ञापत्रात अशी माहिती दिली आहे की, आपल्याविरोधात अनेक गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. त्यांनी सर्वाधिक ३६.६७ टक्क्यांच्या फरकाने विजय मिळविला आहे. निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संघटनेने सांगितले की, केवळ ८ आमदार असे आहेत ज्यांची प्रतिमा स्वच्छ आहे आणि त्यांनी अशा उमेदवारांना पराभूत केले ज्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत.अहवालानुसार ४३ आमदारांविरुद्ध गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. यातील ३७ आमदारांविरुद्ध बलात्कार, हत्येचा प्रयत्न, महिलांविरुद्धचे गुन्हे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एडीआरनुसार, ज्या ३७ आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यातील १३ आमदार महिलांविरुद्धच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत.
४३ आमदारांविरोधात दिल्लीत फौजदारी खटले; २६ उमेदवारांनी निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेच्या प्रतिस्पर्ध्याला केले पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 1:22 AM