लंडन : ‘एआय’चा वापर मानवी हितासाठी झाला पाहिजे. मात्र, असे तंत्रज्ञान विकृत लाेकांच्या हाती पडले की अनेक धाेके निर्माण हाेतात. असाच एक धाेका म्हणजे, ‘एआय’चा वापर करून लहान मुलांचे अश्लील छायाचित्रे तयार करून त्यांचे लैंगिक शाेषण करण्याचे प्रमाण वाढत आहे. इंटरनेट वाॅच फाउंडेशन (आयडब्ल्यूएफ) नावाच्या संस्थेने याबाबत अलर्ट दिला आहे. गेल्या वर्षी अशा प्रकारची संवेदनशील माहिती असलेली लाखाे पेजेस इंटरनेटवरून हटविण्यात आली आहेत.
‘एआय’ वापरून गुन्हेगार लहान मुलांची अश्लील छायाचित्रे इंटरनेटवर शेअर करत आहेत. त्यावर ‘आयडब्ल्यूएफ’ने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
२२ लाख वेब पेजेस हटविले
‘आयडब्ल्यूएफ’ने वर्ष २०२२ मध्ये इंटरनेटवरून अशा प्रकारची तब्बल २२ लाख वेब पेजेस हटविली आहेत. त्यावर मुलांची छायाचित्रे होती.
त्यांना जाळ्यात अडकविण्यासंबंधी गुन्हेगारांचे काॅलदेखील रेकाॅर्ड केले आहेत. त्यात ‘एआय’वरून मुलांची अधिकाधिक जिवंत छायाचित्रे कशी काढता येतील, याबाबत सांगण्यात येत हाेते.
कोण आहे ‘आयडब्ल्यूएफ’?
ही संघटना इंटरनेटवरील आक्षेपार्ह माहिती हटविते. या संघटनेला लहान मुलांच्या लैंगिक शाेषणाशी संबंधित माहितीवर लक्ष ठेवण्याचा परवाना मिळाला आहे. मुलांच्या शाेषणाबाबत अशा प्रकारची छायाचित्रे इंटरनेटवर टाकण्याचा एक ट्रेंड आम्ही पाहिला. त्यातून मुलांवर त्यांची छायाचित्रे पाठविण्यासाठी दबाव टाकण्यात येताे. असा प्रकार भविष्यात वाढणार आहे.- सुजी हरग्रीव्ह्ज, सीईओ, ‘आयडब्ल्यूएफ’