नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे कित्येकांना संकटाचा सामना करावा लागला आहे. लॉकडाउनमध्ये कामगार आणि मजूर वर्गाचे मोठे हाल झाल्याचं देशानं पाहिलंय. तर, लहान-मोठे दुकानदार आणि हातावर पोट असणारे टपरीवाले यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. यासोबतच, समाजातील एका नोकरदार वर्गालाही याचा फटका बसला आहे. आपलं दु:खणं धड कुणाला सांगता येईना अन् कुणाला मागता येईल, अशी अवस्था या वर्गाची झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, परिस्थितीचं वास्तव स्विकारुन एका इंग्रजी शिक्षकाने चक्क फळे आणि भाजीपालाच विकायला सुरुवात केली आहे.
कोरोना महामारीच्या संकटात लोकांना आरोग्यासह इतरही समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. कामगार व मजूर वर्गाचे मोठे हाल झाले असून सरकारने सांगितल्यानंतरही अनेकांना आपला पगार मिळाला नाही. कामच केलं नाही तर, पगार द्यायचा कसा? असे म्हणत कित्येक लहान-मोठ्या उद्योगांनी कामगारांना दुसऱ्या महिन्यात वेतनच दिले नाही. विशेष म्हणजे खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या एका विशिष्ठ वर्गालाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. राजधानी दिल्लीतील एका सरकारी शाळेत शिकविणाऱ्या इंग्रजीच्या शिक्षकाने चक्का हातगाड्यावर फळे विकण्यास सुरुवात केली. या शिक्षकाचे नाव वजीर सिंह असून ते सर्वोदय बाल विद्यालयात इंग्रजी विषय शिकवतात.
एएनआयसोबत बोलताना, मी सर्वोदय बाल विद्यालयात मानधनावर नियुक्त शिक्षक आहे. कोरोना महामारीच्या संकटात गेल्या 8 मे पासून मला वेतन मिळाले नाही. त्यामुळे, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातगाड्यावर भाजीपाला विकण्याची वेळ माझ्यावर आली असून हे अतिशय लज्जास्पद असल्याचे सिंह यांनी म्हटलंय. तसं पाहिलं तर कुठलेही काम लहान किंवा मोठे नसते. मात्र, एका शिक्षकाला आपलं शिक्षण देण्याचं काम सोडून भाजी विकण्याचं काम करावं लागत आहे, हे अपमाजनक असल्याचं सिंह यांनी म्हटलंय.
वजिर सिंह यांना भाजी विकताना पाहून त्यांचे परिचित आणि मित्र परिवारही आश्चर्यचकित होत आहे. दरम्यान, दिल्लीतील सरकारी शाळांमधील शिक्षकांना वेतन मिळत आहे. मात्र, मानधनावर शिक्षण देण्याचं काम करणाऱ्या देशातील लाखो शिक्षकांची परिस्थिती अशीच आहे. लॉकडाउनमुळे तथाकथित उच्च वर्गाच्या आतील चित्र असं भयानक आहे.