सुरेश भटेवरा, नवी दिल्लीउत्तर प्रदेशात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान आठवड्यावर आलेले असताना भाजपामध्ये तिकीटवाटपावरून निर्माण झालेल्या अंतर्कलहाचे संकट अमित शाहंसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाभोवतीच धोक्याची घंटा वाजू लागली आहे. रा.स्व. संघ व भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्येही या घंटानादाचा प्रतिध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो आहे.
भाजपाच्या निवडणूक समितीच्या २ बैठकांनंतर, तिकीटवाटपाचे सारे अधिकार अमित शाह यांच्या स्वाधीन केले. मात्र त्यातून अमित शाह यांचा सारा रूबाबच खाली आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत सलग ७ वेळा निवडून आलेले आमदार श्यामदेव चौधरींचे तिकीट कापले गेल्यावर पक्षनेतृत्वाच्या विरोधात कडवट निदर्शने सुरू झाली आहेत. ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्यांसाठी तत्काळ तिकिटाची खिडकी उघडली.
घराणेशाही राबवणाऱ्या नेत्यांच्या मुला-मुलींना तिकिटे दिली. परिणामी, अमित शाह, केशव प्रसाद मौर्य व प्रदेश प्रभारी ओम माथूर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे जागोजागी दहन झाले. यूपीत यंदा स्थानिक कार्यकर्त्यांच्या सल्ल्याला अजिबात किंमत न देणाऱ्या शाह यांना थेट धडा शिकवण्याच्या इराद्याने कार्यकर्ते पेटून उठले आहेत.भाजपाकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार नाही.
मोदींच्या आक्रमक प्रचाराला राहुल-अखिलेश ही तरुण नेत्यांची जोडी अधिक आक्रमक आवेशात प्रत्युत्तर देत असल्याने रणमैदानात भाजपाची पंचाईत झाली आहे. गोरखनाथ पीठाचे महंत खासदार योगी आदित्यनाथ स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे राज्यात क्रमांक १चे दावेदार मानतात. पूर्वांचलात भाजपाची तिकिटे ज्यांना मिळाली नाहीत अशा योगी समर्थकांनी ‘देश में मोदी और यूपी में योगी’ घोषणा देत ‘हिंदू युवा वाहिनी’तर्फे समांतर उमेदवार मैदानात उतरवले आहेत. या बंडखोरीमुळे भाजपाचा पूर्व उत्तर प्रदेशात पराभव झाल्यास त्याचे खापर एकट्या अमित शाह यांच्याच डोक्यावर फुटणार आहे.