नवी दिल्ली : साधारण वर्षभराने देश पुन्हा कोरोनाच्या विळख्यात (Corona Virus) सापडला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. कोरोनाची लसही (Corona Vaccine) मोठ्याप्रमाणावर दिली जात आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. (PM Narendra Modi called meeting of Chef ministers on Corona Virus.)
महाराष्ट्रातील नागपूरसह काही ठिकाणी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. पंजाबच्या आठ जिल्ह्यांत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. राज्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने नियम कडक केले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये देशातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.
कोरोनाचे २६ हजारांहून अधिक नवे रुग्ण सोमवारी आढळून आले. गेल्या ८५ दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. २० डिसेंबर रोजी कोरोनाचे २६,६२४ नवे रुग्ण सापडले होते. देशात कोरोनाचे १ कोटी १३ लाख रुग्ण असून, त्यातील १ कोटी १० लाख रुग्ण बरे झाले. १२ फेब्रुवारी रोजी उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ३० हजार होती. पण, अवघ्या महिनाभराच्या कालावधीत त्यामध्ये सुमारे ९० हजार रुग्णांची भर पडली आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या मृत्युदरात आणखी घट होऊन तो १.३९ टक्के झाला.
महाराष्ट्रातून येणाऱ्यांना आठवडाभर क्वारंटाईनमहाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना एक आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. मध्य प्रदेशने छिंदवाडा, बालाघाट, बैतूल, सिओनी, खांडवा, बारवानी, खरगोन, बुऱ्हाणपूर या आठ सीमावर्ती जिल्ह्यांच्या प्रशासनाला तसे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्रातही 15000 हून अधिक रुग्ण सापडले आहेत.
अमेरिकेत ३ कोटी कोरोना रुग्णअमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटींवर पोहोचली आहे. तिथे २ कोटी २२ लाख जण बरे झाले असून ७३ लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. या देशात बळींचा आकडा साडेपाच लाखांच्या घरात पोहोचला आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १२ कोटी ४ लाख झाली असून, त्यातील ९ कोटी ६९ लाख लोक बरे झाले तर २ कोटी ७ लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. जगात या संसर्गाने २६ लाख ६५ हजार लोकांचा बळी गेला आहे.