नवी दिल्ली : वृत्त आणि विचार यांच्यातील विभाजन रेषा धूसर होत चालली आहे. यामुळे दर्शक आणि वाचकांना तथ्य शोधावी लागत आहे. मीडियातील ‘कर्णकर्कश’ चर्चाही तथ्यांपेक्षा वरचढ ठरत आहेत, असे निरीक्षण माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांनी नोंदवले.मंगळवारी जेटलींनी ‘भारतातील प्रसारमाध्यमे २०१४-१५’ हा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी भाष्य करताना जेटलींनी उपरोक्त निरीक्षण नोंदवले. अलीकडे खासगी वृत्तवाहिन्यांचा जणू पूर आला आहे. या वृत्तवाहिन्यांवरील ‘कर्णकर्कश’ चर्चा दर्शक पाहतात व ऐकतातही. पण याउपरही दर्शक तथ्यांपासून दूर राहतात. खरे काय, हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा त्यामुळे पूर्ण होऊ शकत नाही. अशास्थितीत खरे काय, याचा निर्णय दर्शक व वाचकांनाच घ्यायचा आहे, असे जेटली म्हणाले. वृत्तवाहिन्यात अनेकदा खळबळजनक बातम्या देतांना दिसतात आणि अशा बातम्या अनेकदा तथ्यांपासून दूर गेलेल्या दिसतात. याऊलट वृत्तपत्रे वा प्रिंट मीडिया स्पष्ट व निष्पक्षपणे तथ्य सादर करू शकतो.बातमीत स्वत:चे विचार न घालता निष्पक्ष बातमी वाचकांपर्यंत पोहोचविण्याची मोठी संधी प्रिंट मीडियाकडे आहे. जगात वृत्तपत्र उद्योगाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असताना भारतात वृत्तपत्र उद्योग भरभराटीस येताना दिसतो आहे, हा लोकशाहीसाठी शुभसंकेत असल्याचेही ते म्हणाले.
‘कर्णकर्कश चर्चा ठरताहेत तथ्यांपेक्षा वरचढ’
By admin | Published: December 30, 2015 2:11 AM