नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात जंतर-मंतर गेल्या अनेक दिवसांपासून देशातील दिग्गज कुस्तीपटूंचेआंदोलन सुरू आहे. सुरुवातीला या आंदोलनावर भारताची माजी अॅथलीट आणि राज्यसभा खासदार पीटी उषा यांनी टीका केली होती. पण, आता त्यांनी या आंदोलक पैलवानांची भेट घेतली आहे.
पै. बजरंग पुनियाने सांगितले की, पीटी उषाने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना सांगितले की, त्या पैलवानांसोबतच आहेत आणि न्याय मिळवून देणार आहेत. त्या आधी अॅथलीट आहे आणि नंतर इतर काही. त्या लवकरात लवकर कुस्तीपटूंच्या समस्येकडे लक्ष देणार असून, त्यांच्या समस्यांचे निराकरणही करणार आहेत. दरम्यान, जोपर्यंत ब्रिजभूषण शरण सिंह तुरुंगात जात नाही, तोपर्यंत जंतरमंतर सोडणार नसल्याचे पुनियाने स्पष्ट केले आहे.
पीटी उषा यांची टीकायापूर्वी पीटी उषा म्हणाल्या होत्या की, 'खेळाडूंनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करायला नको होतं. त्यांनी किमान समितीच्या अहवालाची वाट बघायला हवी होती. त्यांनी जे केलं, ते खेळ आणि देशासाठी चांगलं नाही. हा एक नकारात्मक दृष्टीकोन आहे. त्यांनी नियमाचे पालन केले नाही.' यानंतर कुस्तीपटूंनी पीटी उषाच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
ब्रिजबूषणवर काय आरोप?लैंगिक छळाच्या आरोपांवरुन ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात राष्ट्रीय राजधानीतील जंतरमंतर येथे शीर्ष भारतीय कुस्तीपटू निदर्शने करत आहेत. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून 2 गुन्हे दाखल केले आहेत. एफआयआरपैकी एक अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवर आधारित आहे. पोलिस कारवाईचे आश्वासन देऊनही, कुस्तीपटूंनी सांगितले की ते WFI प्रमुखाला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांचा संप सुरू ठेवतील.