दलितांचे हक्क हिसकावणे हाच भाजपचा कार्यक्रम, काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 06:20 AM2019-08-20T06:20:37+5:302019-08-20T06:20:50+5:30
राखीव जागांच्या बाजूचे आणि राखीव जागांच्या विरोधात असलेल्यांमध्ये सलोख्याच्या वातावरणात संवाद झाला पाहिजे, असे भागवत यांनी म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेसने हा हल्ला केला.
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राखीव जागांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून संघ आणि भारतीय जनता पक्षाचा दलित-मागासवर्गविरोधी चेहरा उघड झाला आहे, अशी टीका काँग्रेसने सोमवारी केली.
राखीव जागांच्या बाजूचे आणि राखीव जागांच्या विरोधात असलेल्यांमध्ये सलोख्याच्या वातावरणात संवाद झाला पाहिजे, असे भागवत यांनी म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेसने हा हल्ला केला.
गरिबांच्या हक्कांवर हल्ला, घटनात्मक हक्क पायदळी तुडवणे, दलित-मागासवर्गीयांचे हक्क हिसकावून घेणे हाच भाजपचा कार्यक्रम (अजेंडा) आहे, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले. ‘दलित-मागासवर्गाच्या विरोधातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजप यांचा चेहरा उघडा पडला आहे.
गरिबांसाठीच्या राखीव जागा संपवण्याचा कट आणि घटनेत बदल करण्याचे त्यांचे धोरण उघड झाले आहे, असे सुरजेवाला यांनी हिंदी भाषेत केलेल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अनुसूचित जाती/जमातींसाठीच्या राखीव जागा राहिल्याच पाहिजेत. राखीव जागांवर चर्चेची गरज असल्याचे मला वाटत नाही, असे सोमवारी म्हटले. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी राखीव जागा ही घटनात्मक व्यवस्था असून तिच्यात हस्तक्षेप अनुचित व अन्याय आहे, असे म्हटले.
काय म्हणाले, मोहन भागवत?
राखीव जागांच्या बाजूचे असलेले जेव्हा राखीव जागांना विरोध असलेल्यांचे म्हणणे ऐकतील व राखीव जागांना विरोध असलेल्यांचे म्हणणे राखीव जागांच्या बाजूचे ऐकतील तेव्हा कुठे आम्ही या प्रश्नावर उत्तर शोधू शकू. तेही एका मिनिटात, कायद्याशिवाय, नियमांशिवाय.
जोपर्यंत समाजात सुसंवाद, ऐक्य असणार नाही तोपर्यंत कोणीही या प्रश्नाचे (राखीव जागा) उत्तर देऊ शकणार नाही. आम्ही असा प्रयत्न करायला हवा आणि संघ तसा करतो आहे, असे भागवत स्पर्धात्मक परीक्षांवर आयोजित ‘ग्यान उत्सव’च्या समारोपाच्या सत्रात बोलताना म्हणाले होते.
राष्ट्रीय स्वयंसवेक संघ म्हणतो, राखीव जागांना पाठिंबाच
आम्ही नेहमीच राखीव जागांना पाठिंबा दिलेला आहे, असा खुलासा राष्ट्रीय स्वयंसवेक संघाने केला आहे.
संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरूण कुमार यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी व आर्थिक आधारावर मागासलेल्या वर्गांसाठी राखीव जागांना संघाचा पाठिंबाच आहे व ही बाब अनेकवेळा स्पष्ट करण्यात आली आहे.