लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारतासह पंतप्रधान मोदींविरोधात टिप्पणी केली. त्यानंतर भारतीयांनी ‘बायकॉट मालदीव’हा ट्रेंड सुरू केला असून त्यात सेलिब्रिटींनीही उडी घेतली. त्यानंतर मालदीव सरकारने सारवासारव करत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मरियम शिउना, जाहीद रमीझ आणि महजूम माजिद यांना निलंबित केले.
पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीप दौऱ्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर भारतीय पर्यटकांमध्ये लक्षद्वीपच्या पर्यटनाबाबत कौतुक केले जाऊ लागले. मालदीवला जाण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा लक्षद्वीपला जाणे चांगले आहे, असे अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले. यामुळे संतप्त झालेल्या मालदीवच्या सत्ताधारी प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीवच्या (पीपीएम) मंत्री मरियम शिउना आणि नेते जाहिद रमीझ यांनी भारतीयांची खिल्ली उडवली. शिउना यांनी एक्सवर पंतप्रधान मोदींसाठी आक्षेपार्ह शब्द वापरले. त्याचवेळी जाहिद रमीझ यांनी भारत आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, असे म्हटले.
अनेक नेत्यांकडून टीका
सदर प्रकाराबाबत मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यमान राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी या प्रकाराबाबत भारताशी चर्चा करून आपली बाजू मांडावी. सरकार या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट करावे, असे त्यांनी म्हटले.
मालदीवमध्ये आदरातिथ्य, शांतता, सहिष्णुतेच्या मुद्यावर पर्यटन व्यवसाय विकसित झाला आहे. भारतासह जगभरातील कंपन्यांनी येथे मोठी गुंतवणूक केली. त्यामुळे आज झालेला प्रकार हा अत्यंत चुकीचा असल्याचे माजी राष्ट्रपती अहमद अदीब यांनी म्हटले.
भारतीय पर्यटनाला पाठिंबा देऊ या...
- बॉलिवूड स्टार अक्षय कुमारने ट्वीट केले की, मालदीवमधील प्रमुख सार्वजनिक व्यक्तींकडून भारतीयांबद्दल द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी टिप्पण्या आल्या.
- मालदीवमध्ये भारतातून सर्वाधिक पर्यटक येत असताना, त्यांनी मत व्यक्त करणे हे आश्चर्यकारक आहे.
- मी मालदीवला अनेकदा भेट दिली आहे आणि नेहमी त्याची प्रशंसा केली आहे, पण आता आपण #ExploreIndianIslands म्हणत स्वतःच्या पर्यटनाला पाठिंबा देऊया.
- सचिन तेंडुलकरने सिंधुदुर्गला पर्यटनाला जाण्याचे आवाहन केले, तर जॉन अब्राहमनेही लक्षद्वीपचा आग्रह धरला.
भारतीयांनी फिरवली मालदीव पर्यटनाकडे पाठ
नेते जाहिद रमीझच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर भारतीय आणि मालदीवच्या नागरिकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. भारतीय लोकांचा संताप इतका वाढला की #BoycottMaldives ही मोहीम सुरू झाली. अनेक भारतीयांनी मालदीवच्या सुट्या रद्द केल्या आहेत.
हॉटेल, विमानांचे बुकिंगही झाले रद्द
मालदीवच्या बहिष्काराच्या ट्रेंडमुळे आतापर्यंत मालदीवमधील ८,००० हून अधिक हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आले आहेत. दुसरीकडे, २५०० हून अधिक लोकांनी मालदीवसाठी जाणाऱ्या विमानांची तिकिटे रद्द केली आहेत. त्याचा फटका मालदीवला बसत आहे.
मालदीव सरकारकडून नरमाईची भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारताबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानावर भारतीय उच्चायुक्तांनी तेथील सरकार समक्ष हा मुद्द मांडला. त्यानंतर मालदीव सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. सदर वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. सरकार त्यांच्या मताशी सहमत नसल्याचे म्हटले.