सचिन पायलट यांच्यावर टीका, गेहलोतांना काँग्रेसचा स्पष्ट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 06:44 AM2022-11-29T06:44:52+5:302022-11-29T06:55:42+5:30
‘राजस्थानमध्ये काही मतभेद आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही अनपेक्षित शब्द वापरले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गेल्या आठवड्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सचिन पायलट यांच्याबाबतीत केलेले वक्तव्य करायला नको होते, वेळ पडल्यास काँग्रेस राजस्थानमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही,’ असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे भारत जोडो यात्रेदरम्यान दिला आहे.
‘राजस्थानमध्ये काही मतभेद आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही अनपेक्षित शब्द वापरले आहेत. मला आश्चर्य वाटले. अशोक गेहलोत यांनी मुलाखतीत असे शब्द वापरायला नको होते,’ असे रमेश यांनी सांगितले. ‘आम्ही राजस्थानच्या समस्येवर तोडगा काढू, ज्यामुळे आमची संघटना मजबूत होईल. यासाठी जर आम्हाला कठोर निर्णय घ्यायचे असतील तर आम्ही ते घेऊ. जर तडजोड करायची असेल तर ती केली जाईल,’ अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
नेमका वाद काय ?
गुरुवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री गेहलोत यांनी प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांच्यावर टीका करताना ते कधीही राजस्थानचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, असा दावा केला होता. दरम्यान, काँग्रेसला एकतेचे दर्शन घडविणे आवश्यक असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे असे बोलणे अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया पायलट यांनी व्यक्त केली आहे.
दोन्ही नेत्यांची गरज : जयराम रमेश
जयराम रमेश म्हणाले की, पक्षाला दोन्ही नेत्यांची गरज आहे आणि काँग्रेस नेतृत्व राजस्थानमधील वादावर योग्य तोडगा काढण्याचा विचार करत आहे. पुढील वर्षी नवीन सरकारसाठी मतदान होईल; परंतु मी या उपायासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करू शकत नाही.