लखनऊ : राजस्थानातील अल्वर येथे दलित महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे राजकारण करीत असल्याबद्दल बसपच्या प्रमुख मायावती यांनी पंतप्रधानांवर कडाडून टीका केली. मोदी दलितांविषयी दाखवत असलेला कळवळा व प्रेम नाटकी असल्याचे त्या म्हणाल्या.
राजस्थानमध्ये निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याचे कारण दाखवून या पीडित महिलेची तक्रार नोंदवण्यात पोलिसांनी दिरंगाई केली असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. त्यामुळे सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना लगेच निलंबित केले. मात्र राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर मोदी यांनी प्रचारसभेत टीका केली. मायावती यांनी या सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असेही पंतप्रधान म्हणाले.
त्याचा उल्लेख करून मायावती म्हणाल्या की, अल्वर येथील बलात्कार प्रकरणावरून मोदींनी नक्राश्रू ढाळू नयेत. दलितांविषयी खोटा कळवळा दाखवून मोदी यांच्या हाती काहीही लागणार नाही. दलितांवरील अत्याचारांबद्दल पंतप्रधानांनी मौन बाळगले होते. निवडणूक प्रचारात परिस्थिती पाहून मोदी आपली वेगवेगळी जात सांगतात, असा आरोपही मायावती यांनी केला आहे.मायावती अपात्र - जेटलीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक आरोप करणाºया मायावती या सार्वजनिक जीवनात वावरण्यास अपात्र आहेत, असे प्रत्युत्तर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहे. मायावतींचा कारभार, त्यांची मूल्ये ही नेहमीच निम्न दर्जाची राहिली आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.