संघाची देशद्रोही विचारसरणी कायम, काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरील व्हिडिओत टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 04:30 AM2019-07-05T04:30:58+5:302019-07-05T04:35:01+5:30
राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा अधिकृतपणे राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘आरएसएस व्हर्सेस इंडिया’ या हॅशटॅगने संघावर सविस्तर टीका करणारा एक मिनिटाचा एक व्हिडिओ टाकण्यात आला.
नवी दिल्ली : महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता, या विधानाबद्दल दाखल झालेल्या बदनामी खटल्यात राहुल गांधी शुक्रवारी भिवंडी येथील न्यायालयात आरोपी म्हणून हजर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने तोच आरोप गुरुवारी पुन्हा केला. एवढेच नव्हे तर संघाची विचारसरणी स्थापनेपासून भारतविरोधी राहिली आहे व आजही ती कायम असल्याचा आरोपही या पक्षाने केला.
राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा अधिकृतपणे राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘आरएसएस व्हर्सेस इंडिया’ या हॅशटॅगने संघावर सविस्तर टीका करणारा एक मिनिटाचा एक व्हिडिओ टाकण्यात आला.
‘आरएसएस फॉर डम्मिज’ या शीर्षकाचा हा व्हिडिओ सामान्य बुद्धिमत्तेच्या मुला-मुलींसाठी असल्याचे म्हटले असून, या मुलांचा वर्ग घेतल्याच्या भाषेत त्यातील मजकूर लिहिण्यात आला आहे.
या व्हिडिओत काँग्रेस म्हणते: रा. स्व. संघ म्हणजे नेमके काय हे ठाऊक आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर जरा पुन्हा विचार करा.
ब्रिटिशांना निष्ठा वाहण्यापासून महात्मा गांधींची हत्या करण्यापर्यंत संघ नेहमीच भारतविरोधी कृत्ये करत आला
आहे.
काँग्रेसने असेही म्हटले की, स्वातंत्र्यलढ्यापासून ते भारतीयत्वाच्या प्रतीकांपर्यंत सर्वच गोष्टींना रा. संघ विरोध करीत आला आहे. स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढत असताना संघवाले ब्रिटिशांपुढे मान झुकवत होते. ‘भारत’ या कल्पनेलाच विरोध करणे हे संघाचे सातत्याने धोरण राहिले आहे.
स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग नव्हता
काँग्रेसने असाही दावा केला की, संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार संघाला सत्याग्रहात भाग न घेण्याचा आदेश दिला होता. त्याउलट संघ स्वयंसेवकांना ब्रिटिश सिव्हिल गार्ड््समध्ये सामील होण्यास प्रोत्साहन देण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी न होण्याची ब्रिटिश राज्यकर्त्यांनी संघाला बक्षिशीही दिली.
संघाने तर आपल्या राष्ट्रध्वजालाही विरोध केला होता. संघ भारतीय राज्यघटनेहून मनुस्मृतीला श्रेष्ठ मानतो, असा दावा करून हा व्हिडिओ पुढे म्हणतो की, आर्थिक उदारीकरणासही संघाचा विरोध आहे. थोडक्यात, संघ विकासाच्या विरोधात आहे.