नवी दिल्ली : हिंदुत्वाच्या नावावर सक्रिय कट्टरवादी तत्त्वांवर अंकुश घालण्यात येईल, अशी अपेक्षा पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. मेहबूबा यांनी या कट्टरवाद्यांची तुलना इस्लामचा गैरवापर करणाऱ्या इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेशी केली.येथे एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, सहिष्णुता ही आमच्या देशाची शक्ती आहे. आम्ही या कट्टरवाद्यांना वेळीच रोखले नाही तर काय होईल? सिरिया, अफगाणिस्तान, इराकमध्ये काय सुरू आहे. ते सुद्धा कट्टरवादीच असून इस्लामच्या नावाचा दुरुपयोग करीत आहेत. दुसरीकडे आमच्या देशातील कट्टरवादी हिंदुत्वाचा गैरवापर करीत असून याची तुलना ते राष्ट्रवादाशी करीत आहेत. ही आणखी चुकीची गोष्ट आहे. मेहबूबा यांचा पीडीपी पक्ष जम्मू-काश्मिरात भाजपासोबत सत्तेत आहे.बिहार निवडणुकीत या कट्टरवादी तत्त्वांना चांगला धडा शिकविण्यात आला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पाकिस्तानात जाण्याची भाषा केली जाते आणि ही वक्तव्ये करण्यात काही केंद्रीय मंत्रीसुद्धा असतात. आपल्या पक्षाला हे योग्य वाटते काय? असा प्रश्न मेहबूबा मुफ्ती यांना विचारण्यात आला होता. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या जागी आपण मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे काय? असा प्रश्न विचारला असता हा प्रश्न मला फारसा भावणारा नाही. कारण याबद्दल विचार करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. मी लोकांसाठी काम करीत असून पुढेही करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. (वृत्तसंस्था)देशातील जनता महागाईचा सामना करीत असताना, त्यांना कांदेही उपलब्ध होत नसताना अचानक काही लोक एखाद्या व्यक्तीने कुठले मांस खाल्ले पाहिजे हे सांगणे सुरू करतात. हे कदापि स्वीकारार्ह नाही. - मेहबूबा मुफ्ती, अध्यक्ष, पीडीपी
कट्टरवाद्यांवर अंकुश हवा - मेहबूबा मुफ्ती
By admin | Published: December 06, 2015 1:33 AM