मुरूड - तालुक्यात ३९०० हेक्टर क्षेत्रात भात शेतीचे पीक घेतले जाते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मुरूड तालुक्यांतील सहभागी शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना भरपाईची आशा होती; मात्र पीक विमा कंपनीची विमा क्लेम देण्याची नकारघंटा असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मुरूड तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याच्या आवाहनाला १४७ शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरमार्फत जुलै २०१९ मध्ये खरीप पीक २०२० साठी पीक विमा काढला. तथापि, पीक विमा कंपनीने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तसेच भात शेती नुकसानाचे पंचनामे करण्याची कुठलीही तसदी घेतली नाही. केवळ क्रॉप इन्शुरन्स ॲप लोड करण्यास सांगुन वेळ मारून नेली. ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या आहेच. शिवाय किती शेतकरी संगणक साक्षर आहेत, हा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी नुकसानाचे सूचना फॉर्म म्हणजे क्लेम अप्लिकेशन केले असेल त्यांनाच विमा कंपनी पीक विमा नुकसान भरपाई देणार असल्याचे समजते. विमा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, कृषी विभागाकडून केलेले भात शेती नुकसानाचे पंचनामे गृहित धरले जातील, असे मोघम उत्तर देत वेळ मारून नेली. लवकरच जनआंदोलनपीक विमा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या बाबतीत संघटनेकडे तक्रारी आल्या असून, आम्ही या जिव्हाळ्याच्या विषयात गांभीर्याने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच मोठे जनआंदोलन उभारणार आहोत असे किसान क्रांती संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष श्रीधर जंजिरकर यांनी सांगितले.
पीक विमा कंपनीची नकारघंटा; शेतकरी हैराण, मुरुडमध्ये पंचनामे करण्यास टाळाटाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 11:43 PM