बंगळुरू - कर्नाटकमधील एका शेतकऱ्याला पीकविमा स्वरुपात चक्क 2 रुपये मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेल्लारी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दौरा केल्यानंतर शेतकऱ्यांची दुर्दशा पाहून तेही चकित झाले. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने पीक विम्याचा प्रिमियम म्हणून 350 रुपये भरले होते. शेतकऱ्याला मिळालेला हा चेक पाहून अधिकारीही अवाक झाले आहेत.
बेल्लारी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दौरा केला. त्यावेळी येथील शेतकऱ्यांची दुर्दशा पाहून हे अधिकारीही गहिवरले. गेल्या दोन वर्षांपासून पीक विम्यासाठी प्रीमियमच्या स्वरूपात पैसे भरूनही विमा मिळालेला नाही. आता, तिसऱ्या वर्षी विमा कंपनीकडून मिळालेला केवळ 2 रुपयांचा चेक या शेतकऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांना दाखवला. शेतकऱ्याकडील तो चेक पाहून अधिकाही चकित झाले. त्यानंतर, संबंधित वीमा कंपनीकडे अधिकाऱ्यांनी विचारणा केली आहे. तसेच शेतकरी शरनेगौडा यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याची माहितीही त्यांनी घेतली. दरम्यान, अशाप्रकारे अनेक शेतकऱ्यांना केवळ 2 ते 3 रुपये पीक वीमा मिळाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.