- नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
नोटाबंदीनंतर ५०० आणि १,००० रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी सरकारने आता नकार दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने नोटीस दिली आहे. त्यामुळे सरकार त्रस्त असतानाच नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या बाहेरची गर्दी वाढत आहे. यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या असल्या, तरी लोकांना मात्र यातून दिलासा मिळालेला नाही. नोटाबंदीनंतरच्या चार महिन्यांनंतरही दिल्लीस्थित रिझर्व्ह बँकेच्या बाहेर लोकांची रांग वाढत आहे. यातून बँकेची डोकेदुखी वाढत आहे. रोजच्या गोंधळामुळे बँकेच्या बाहेर लाउडस्पीकर लावण्यात आला आहे. लोकांशी चर्चा करण्यासाठी एका अधिकाऱ्याची गेटजवळ नेमणूक असते. नियमांपुढे आमचा नाइलाज असल्याचे ही महिला अधिकारी सांगत आहे. नोटा बदलण्यासाठी जास्त काउंटर का उघडले जात नाहीत? असे विचारले असता, मनुष्यबळाची कमी असल्याचे कारण सांगितले जात आहे. चंदीगड येथून नोटा बदलण्यास आलेले सुरेंद्र म्हणाले की, असे नियम बनविण्यात आले आहेत, जेणेकरून कमीत कमी लोक नोटा बदलून घेऊ शकतील. जयपूरहून आलेल्या अलका यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी ३१ मार्चपर्यंत नोटा बदलण्यास सांगितले होते, पण आता नकार देण्यात येत आहे. ही कशी व्यवस्था आहे की, सर्वोच्च स्थानी बसलेल्या व्यक्तीच्या विधानावरही विश्वास केला जाऊ शकत नाही. अनेक वर्षे जकार्तात राहिलेल्या मंजित यांनी सांगितले की, ते ३२ हजारांच्या नोटा बदलण्यास आले. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ४.४५ सांगण्यात आलेली आहे, पण येथे सांगण्यात येत आहे की, अडीचनंतर बँकेत जाता येणार नाही. सायंकाळी त्यांना जकार्ताला जायचे आहे. एक तर त्यांना तिकीट रद्द करावे लागेल. दोन्हीही पर्यायांत त्यांना हजारो रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. २५ हजार रुपये बदलू शकतात एनआरआय २५ हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलू शकतात. जे भारतीय ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या काळात विदेशात होते आणि त्यांनी यापूर्वी नोटा बदलून घेतल्या नाहीत, त्यांच्या जुन्या नोटा बदलून दिल्या जातील. रिझर्व्ह बँकेने दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि नागपूर शाखेतच एनआरआय यांच्यासाठी नोटा बदलून देण्याची व्यवस्था केलेली आहे. दिल्लीत नागरिक पहाटे ५ वाजेपासून एकत्र येत आहेत. मंगळवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत बँकेच्या बाहेर २०० लोकांची गर्दी होती. दररोज शेकडो लोकांची गर्दी - दुपारी २.३० वाजेपर्यंतच बँकेत प्रवेश - एनआरआय बदलू शकतात २५ हजार रुपये - ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत विदेशात असणारे भारतीयही बदलू शकतात नोटा- सुरक्षा गार्ड आणि लोकांत होतात वाद