श्रीनगर - देशातील इतर भागांप्रमाणेच सध्या जम्मू काश्मीरलाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. दरम्यान, या भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या दलदलीत अडकलेल्या एका व्यक्तीला सीआरपीएफच्या श्वानाने शोधून काढत त्याचे प्राण वाचवले.
मंगळवारी रात्री जम्मू - श्रीनगर मार्गावर भूस्खलन झाले. त्यानंतर सीआरपीएफ आणि स्थानिक यंत्रणांनी बचाव कार्यास सुरुवात केली. यावेळी सीआरपीएफच्या पथकासोबत असलेल्या श्वानाला भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या दलदलीत एका व्यक्ती अडकलेली दिसली. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी या व्यक्तीचे प्राण वाचवले.
आणीबाणीच्या प्रसंगी प्रसंगावधान दाखवणाऱ्या सीआरपीएफच्या या श्वानाचे नाव एजाक्सी असून, त्याने वास घेऊन एक व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकलेली असल्याचे हुडकून काढले. सदर व्यक्ती भूस्खलनानंतर रात्रभर ढिगाऱ्याखाली अडकून होती. दरम्यान, मंगळवारी रात्रीपासूनच काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत आहे. खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रासुद्धा रद्द करण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. सध्या स्थानिक प्रशासनाकडून अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.