काश्मीर - जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानाचं सध्या सोशल मिडीयावर भरभरून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. त्याचं कारण असं आहे की, ड्युटीवर असणाऱ्या या जवानाने स्थानिक काश्मिरी महिलेचा आणि तिच्या नवजात मुलाचे प्राण वाचवले आहेत.
25 वर्षीय गर्भवती महिलेला प्रसुती काळाच्यावेळी खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या. प्रसुतीदरम्यान महिलेच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर पडत होतं. गुलशन नावाच्या या स्थानिक महिलेचा जीव धोक्यात आला होता. सर्जरीवेळी तिला रक्ताची गरज होती. अशावेळी त्याठिकाणी तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानाला महिलेच्या कुटुंबीयांनी तिला वाचविण्यासाठी मदत मागितली. महिलेची स्थिती गंभीर होत चालली होती. अशातच सीआरपीएफची 53 व्या तुकडीतील जवान गोहिल शैलश याने तातडीने पुढाकार घेत काश्मिरी महिलेला आणि तिच्या नवजात बालकाला वाचविण्याचा निर्णय घेतला.
जम्मू काश्मीरमधील लोकांसाठी मदत होण्यासाठी एक हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला आरोग्यविषयक काही मदत हवी असल्यास त्या संपर्क क्रमांकावर फोनकरुन मदत दिली जाते. ही हेल्पलाईन सुविधा सीआरपीएफकडून नियंत्रित करण्यात येते.या घटनेची माहिती सीआरपीएफने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन दिली आहे. या फोटोखाली लिहिण्यात आलं आहे की, रक्ताचं नातं! गोहिलच्या रक्ताने काश्मिरी महिलेचा आणि तिच्या नवजात बालकाचा जीव वाचला आहे. सीआरपीएफच्या या जवानावर सोशल मिडीयात कौतुकाचा वर्षाव होत आहे.