श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधल्या उधमपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सीआरपीएफच्या जवानानं तीन साथीदारांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात तिन्ही साथीदारांचा मृत्यू झाला असून, त्यानंतर त्या जवानानं स्वतःला गोळी मारून संपवून घेतलं आहे. तिन्ही जवानांवर गोळ्या झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. उधमपूरमधल्या लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या जवानाचा बट्टल बालियान लष्करी तळावर आपल्याच तीन साथीदारांबरोबर वाद झाला होता. ते चारही जवान सीआरपीएफ 187 या बटालियनचे होते. परंतु त्या चार जणांमध्ये नक्की कशावरून वाद झाला, त्याचं कारण अद्याप सापडलेलं नाही.उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये राहणाऱ्या सीआरपीएफ जवान अजित कुमारनं राजस्थानातील झुनझुनला वास्तव्याला असलेला हेडकॉन्स्टेबल पोरखमल, दिल्लीतल्या मौजपूरमध्ये राहणारा हेडकॉन्स्टेबल योगेंद्र शर्मा आणि हरियाणातील रेवाडी भागात राहणारा हेड कॉन्स्टेबल उमीद सिंह यांच्यावर गोळ्या झाडल्या. तीन जवानांचा या गोळीबारात मृत्यू झाला. तर गोळीबार करणारा कॉन्स्टेबल अजित कुमार हा गंभीर आहे. त्याच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहे.पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाल्यानंतर सीआरपीएफ, बीएसएफसह निमलष्करी दलाच्या जवळपास 10 लाख जवानांनी यंदा होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच दरम्यान ही घटना घडल्यानंतर अनेक जवानांना दुःख झालं आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये CRPF जवानाचा तीन साथीदारांवर गोळीबार, स्वतःवरही झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 10:18 AM