मणिपूरमधील इम्फाळ येथे एका सीआरपीएफ जवानाने त्याच्या दोन सहकाऱ्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतल्याची घटना घडली आहे. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) एका कॅम्पमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका सैनिकाने अंदाधुंद गोळीबार करत आपल्या दोन सहकाऱ्यांची हत्या केली. यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडली. या घटनेत इतर आठ सैनिक जखमी झाले आहेत. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, ही घटना रात्री ८:२० च्या सुमारास इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लाम्फेल येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये घडली.
आरोपी जवान संजय कुमार हा 120व्या बटालियनमधील हवलदार होता. त्याने आपल्या सर्व्हिस राइफलने अचानकपणे गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याने सर्वप्रथम एक कॉन्स्टेबल आणि एका सब-इंस्पॅक्टरला निशाणा बनवले. यात त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने स्वतःवरही गोळी झाडली.
आठ जवान जखमी, रुग्णालयात दाखल -या हल्ल्यात इतर आठ सैनिकही जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने इम्फाळ येथील रिजनल इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. संबंधित घटनेची चौकशी केली जात आहे. लवकरच घटनेमागील कारणांचाही खुलासा करण्यात येईल, असे सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.