इन्फाळ- भारतीय लष्करातील जवान देशवासीयांच्या रक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन सज्ज असतात. जवानांच्या कर्तव्यदक्षतेचा प्रत्यय आणून देणारी घटना मणिपूरमध्ये घडली आहे. इन्फाळमध्ये कर्तव्यावर असलेल्या सीआरपीएफच्या एका जवानाने प्रसंगावधान राखत बसमधून प्रवास करणा-या इतर 20 जवानांचे प्राण वाचवले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, बसमधून सीआरपीएफ जवानांची एक तुकडी कंगपोकपी जिल्ह्यातून इन्फाळमधल्या पश्चिम जिल्ह्यातील लामफेलमधील शिबिराकडे जात होती. त्याच दरम्यान बसमध्ये ग्रेनेड फेकण्यात आला. बसमध्ये पडलेला (ग्रेनेड) बॉम्ब त्या जवानानं पाहिला अन् प्रसंगावधान राखत ग्रेनेड घेऊन त्या जवानानं बसबाहेर धाव घेतली. त्याचदरम्यान या ग्रेनेडचा स्फोट झाला. या जवानाला वीरमरण आले, मात्र बसमधून प्रवास करणाऱ्या 20 जवानांचे प्राण वाचले.उमेश हेलवार असे या वीरमरण आलेल्या जवानाचे नाव असून, ते बेळगावजवळील गोकाक येथील रहिवासी आहेत. ते मणिपूरमधील इंफाळ येथे कर्तव्यावर होते. तिथे एका बसमधून प्रवास करत असताना हेलावार यांना बसमध्ये पडलेले ग्रेनेड दिसले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता हे ग्रेनेड घेऊन ते बसबाहेर धावले. तेवढ्यातच या ग्रेनेडचा स्फोट होऊन हेलवार यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या 20 जवानांचे प्राण वाचले.
जवानाचे अतुलनीय शौर्य, 20 जवानांचे प्राण वाचवून झाला शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 9:44 PM